लेफ्ट. जन. ए. के. भट्ट यांचा इशारा, बर्फवृष्टीचा फायदा उठविण्याची शक्यता

भारतात घुसखोरी करण्यासाठी सीमेपलीकडे मोठय़ा प्रमाणावर दहशतवादी सज्ज आहेत आणि या दहशतवाद्यांना घुसखोरी करणे शक्य व्हावे यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे, अशी माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याचे लष्करातील एका कमांडरने सांगितले.

भारतात घुसखोरी करण्यासाठी सीमेपलीकडे मोठय़ा प्रमाणावर दहशतवादी सज्ज असून या वेळी बर्फवृष्टी कमी असल्याने लवकरच घुसखोरीचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे.

मात्र आम्ही प्रतिकार करण्यास सज्ज आहोत, या घुसखोरांना भारतात घुसखोरी करणे शक्य व्हावे यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असण्याची शक्यता आहे, कुपवाडा आणि तंगधर येथे हाच प्रकार घडला, असे लेफ्ट. जन. ए. के. भट्ट यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे हे दहशतवादी ३०-४० च्या गटाने असून ते लेपा खोऱ्यापासून मंडल परिसरापर्यंत १६१ ब्रिगेड, रामपूर आणि अन्य परिसरांत आहेत. पाकिस्तानने कोणतीही आक्रमक कृती केली अथवा घुसखोरांना भारतीय हद्दीत धाडण्याचा प्रयत्न केला तर त्याला सडेतोड जबाब दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा जिल्ह्य़ातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सोमवारी उधळून लावला, असे पोलिसांनी सांगितले.रामगड क्षेत्रांत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयास्पद हालचाली दिसल्या. तेव्हा त्यांनी तेथे गोळीबार केला. त्यामुळे संशयित दहशतवाद्यांना पसार होणे भाग पडले आणि त्यांचा घुसखोरीचा प्रयत्न फसला, असे पोलिसांनी सांगितले.

((    दहशतवादाने धगधगणाऱ्या काश्मीरमध्ये स्थानिक युवकांची जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फ्रंट्री रेजिमेंट सेंटरमध्ये पहिली लष्करी तुकडी बनविण्यात आली. सोमवारी २१९ जवानांनी प्रशिक्षण कालावधी पूर्ण करीत शपथ घेतली.))