iPhone 18 Pro Sale India: ॲपलच्या २०२६ फॉल लाइनअपमधील ज्या नवीन उत्पादनांची लोक खूप दिवसांपासून उत्सुकतेने वाट पाहत होते, त्यांची विक्री सुरू झाली आहे. आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्सची भारतात आजपासून विक्री सुरू झाली असून, नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी देशभरातील ॲपलच्या दुकानांबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. दिल्ली, नोएडा, मुंबई व बंगळुरूमधील प्रमुख दुकानांबाहेर सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी झाली होती.

सकाळी ८ वाजताच विक्रीला सुरुवात

ॲपलने भारतातील आपल्या प्रत्यक्ष दुकानांवर सकाळी ८ वाजता आयफोन १८ प्रो सीरिजची विक्री सुरू केली. नवीन फोन खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहक पहाटेपासूनच दुकानांबाहेर पोहोचले होते. फोनची किंमत जास्त असतानाही ग्राहकांचा उत्साह कमी झालेला दिसला नाही. नवीन आयफोन हातात घेण्यासाठी अनेक जण तासन्‌ तास रांगेत उभे राहिले.

‘आयफोन लाॅंच म्हणजे माझ्यासाठी सण’

बंगळुरूमधील राहुल नावाच्या ग्राहकाने सांगितले की, तो आयफोन ७ पासून सातत्याने नवीन आयफोन खरेदी करीत आहे. यंदाही तो पहाटे सुमारे ५ वाजता ॲपलच्या दुकानाबाहेर पोहोचला.

तो म्हणाला, “मी सकाळी सुमारे ५ वाजल्यापासून इथे आहे. मोठी रांग होती. हरियाणा, दिल्ली आणि मुंबईहूनही लोक केवळ आयफोन खरेदी करण्यासाठी आले आहेत. मी खूप वर्षांपासून आयफोन खरेदी करीत आहे. माझा पहिला आयफोन ७ होता. त्यानंतर मी सातत्याने आयफोन खरेदी करत आलो आहे. माझ्यासाठी आयफोन लाॅंच म्हणजे एका सणासारखा आहे. दरवर्षी मी आयफोन खरेदी करण्याचा प्रयत्न करतो.”

पहिला आयफोन १८ प्रो मॅक्स मिळाल्याचा दावा

नोएडातील डीएलएफ मॉलमधील ॲपलच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. पंजाबहून आलेल्या एका ग्राहकाने सांगितले की, तो सकाळी ६ वाजल्यापासून रांगेत उभा होता आणि त्याने केलेले बुकिंग सर्वांत पहिले असल्याने आपल्याला पहिला आयफोन १८ प्रो मॅक्स मिळाल्याचा दावा त्याने केला.

त्याने एएनआयला सांगितले, “मी दोन आयफोन १८ प्रो मॅक्स घेतले आहेत. मी पंजाबहून आलो आहे आणि सकाळी ६ वाजल्यापासून रांगेत उभा आहे. माझे बुकिंग सर्वांत आधीचे होते. फोन मिळवणारा मी पहिला ग्राहक आहे.”

आयफोन १३ वरून १८ प्रोवर अपग्रेड

बंगळुरूमधील आणखी एका ग्राहकाने आयफोन १३ वरून नवीन मॉडेलवर अपग्रेड केल्याचे सांगितले. नवीन फोनमधील फीचर्समुळे हा अपग्रेड योग्य असल्याचे त्याने म्हटले.

“मी याआधी आयफोन १३ वापरत होतो, त्यामुळे हा अपग्रेड योग्य आहे. यामध्ये अनेक फीचर्स आहेत. मला खूप चांगले वाटत आहे. मी केवळ पाच मिनिटांत फोन घेऊन बाहेर आलो,” असे त्याने सांगितले.

१०-१२ तासांच्या प्रतीक्षेनंतर फोन हातात

महाराष्ट्रातील एका ग्राहकाने तर पहिला फोन मिळविण्यासाठी सुमारे १० ते १२ तास प्रतीक्षा केल्याचे सांगितले. “मला मुंबईतला पहिला फोन मिळाला आहे. मी खूप आनंदी आहे. पहिला फोन मिळवण्याचा माझा प्रयत्न होता. त्यासाठी मी सुमारे १० ते १२ तास इथे वाट पाहत होतो. अखेर पहिला फोन माझ्या हातात आला. मी मागच्या तीन वर्षांपासून आयफोन वापरत आहे,” असे त्याने सांगितले.

ऑनलाइन आणि देशभरातील सहा ॲपलच्या दुकानांवर विक्री

आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्सची विक्री ॲपलच्या ऑनलाईन स्टोअरसह देशभरातील सहा थेट ग्राहकांना विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये सुरू झाली आहे. लाॅंचच्या दिवशी ॲपल दुकाने सकाळी ८ वाजता उघडण्यात आली असून, रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना सकाळपासूनच नवीन आयफोन खरेदी करण्याची सुविधा मिळत आहे.

ॲपलच्या २०२६ फॉल लाइनअपमध्ये आयफोन १८ प्रो सीरिजसोबत एअरपॉड्स ५, ॲपल वॉच सीरिज १२, ॲपल वॉच अल्ट्रा ४ आणि कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन ड्युओ यांचाही समावेश करण्यात आला आहे.