स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटकेत असलेला क्रिकेटपटू एस. श्रीशांत आणि अन्य काही आरोपींचा जामीन अर्ज दिल्लीतील न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १८ जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. दरम्यान, श्रीशांत, अजित चंडिला, अंकित चव्हाण यांच्यासह एकूण २६ आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे. स्पॉट फिक्सिंगचा खटला न्यायालयात अधिक खंबीरपणे मांडण्यासाठीच या सर्व आरोपींविरोधात मोक्का लावण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
आयपीएलमधील सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी १६ मे रोजी मुंबईतून या तिन्ही क्रिकेटपटू आणि सट्टेबाजांना ताब्यात घेतले होते. मोक्का कायद्यातील तरतुदीनुसार उपायुक्त किंवा त्यावरील पोलिस अधिकाऱयासमोर दिलेली गुन्ह्याची कबुली ही न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते.