Encounter Specialist IPS Ajay Sharma West Bengal Controversy: भाजपा आणि तृणमूल काँग्रेससाठी प्रतिष्ठेची झालेली पश्चिम बंगाल निवडणूक अनेक विषयांमुळे गाजत आहे. मतदार याद्यांची सखोल फेर तपासणी असो किंवा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया यामुळे बंगाल निवडणूक विशेष चर्चेत आहे. अशात अलिकडेच मोठ्या संख्येने केंद्रीय तुकडीचे जवान बंगालमध्ये तैनात करण्यात आले आहेत. यासह उत्तरप्रदेशमध्ये सिंघम म्हणून प्रसिद्ध असणारे कडक शिस्तीचे आयपीएस अधिकारी अजय पाल शर्मा यांची संवेदनशील दक्षिण २४ परगनात निरीक्षक म्हणून निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. यामुळे तृणमूल आणि भाजपात जोरदार वाद होत आहे.
व्हिडीओ समोर आल्यानंतर वाद
एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असणारे अजय शर्मा यांचा अलिकडेच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यात अजय शर्मा तृणमूलचे उमेदवार जहांगीर खान यांच्या समर्थकांना सज्जड दम देताना दिसत आहेत. यानंतर तृणमूल काँग्रेसकडून संताप व्यक्त केला जात आहे. २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणारे अजय शर्मा मुळचे लुधियाना पंजाबचे रहिवासी आहेत. अतंत्य कडक शिस्तीचे मानले जाणाऱ्या शर्मा यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांची दबंग पोलिस अधिकारी अशी ओळख निर्माण झाली आहे. ममता बॅनर्जी यांचा प्रभाव असलेल्या दक्षिण २४ परगना या संवेदनशील भागात त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या भागात ३६ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख
अजय शर्मा सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून काम करत आहेत. अतिशय कतृत्ववान अधिकारी म्हणून त्यांची उत्तर प्रदेशमध्ये ओळख आहे. त्यांनी अत्यंत कठीण आणि जोखमीच्या कारवायांमध्ये सहभाग घेऊन त्या यशस्वी केल्याचे सांगितले जाते. शामली, नोएडा, जौनपूर आणि रामपूर भागात त्यांच्या कामाची प्रचिती आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या क्राईम मुक्त उत्तर प्रदेशसाठी काम करताना त्यांनी डझनभर एन्काऊंटर केलेत. यातूनच त्यांंची एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख निर्माण झाल्याचे सांगितले जाते. अधिकारी होण्यापूर्वी शर्मा पूर्वी दंत चिकित्सक म्हणून काम करत होते. शर्मा यांचे बंधू देखील प्रशासकीय सेवेत असून ते एक आयएएस अधिकारी आहेत.
पहिला एन्काऊंटर
२०१८ साली रामपूरमध्ये सहा वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक करताना झालेल्या चकमकीत संशयित आरोप ठार झाला होता. या घटनेनंतर शर्मा यांची एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख निर्माण झाल्याचे सांगितले जाते. शर्मा यांनी नोएडा येथे लाच घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडून तात्काळ निलंबित केले होते. २०२१ रोजी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जवळपास ९ एन्काऊंटर केले असल्याचे सांगितले.
विविध आरोप
दरम्यान, शर्मा यांच्या विरोधात देखील भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आले आहेत. बदली आणि पोस्टिंगसाठी लॉबिंग केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर मेरठ येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आला पण, हा खटला पुढे चालला नाही. अलिकडेच टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी एक्स (X) वर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये शर्मा एका खोलीत महिलांसोबत नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ खरा असून तो एआय-निर्मित नाही, असे मोईत्रा यांनी म्हटले आहे.
आरोप – प्रत्यारोप
दक्षिण २४ परगना येथून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान मतदारांना धमकी देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानंतर अजय शर्मा घटनास्थळी दाखल झाले. जहांगीर यांना सांगा की नियमात राहा नाहीतर आम्ही योग्य ती कारवाई करु, असा सज्जड दम शर्मा या समोर आलेल्या व्हिडीओत देताना दिसत आहेत. यावरुन तृणमूलने देखील शर्मा यांच्यावर टीका केली आहे. तुम्ही हा विषय हातात घेतल्यास, तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने किंमत मोजावी लागेल, अशी एक्स पोस्ट तृणमूलकडून करण्यात आली आहे. अखिलेश यादव यांनी अजय शर्मा यांना भाजपाचे एजंट म्हणत डिवचले.
