IPS Anshika Verma Success Story: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील आयपीएस अधिकारी अंशिका वर्मा यांची यशोगाथा आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करत १३६ वा अखिल भारतीय क्रमांक (AIR) मिळवला आणि आपल्या स्वप्नांना आकार दिला.

३ जानेवारी १९९६ रोजी जन्मलेल्या अंशिका वर्मा यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण प्रयागराजमध्येच झाले. त्यांच्या वडिलांचे नाव अनिल वर्मा असून ते सरकारी सेवेत कार्यरत होते आणि आता सेवानिवृत्त झाले आहेत. शैक्षणिकदृष्ट्या उज्वल असलेल्या अंशिकाने नोएडा येथून २०१८ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पूर्ण केले. पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.

स्व-अभ्यासावर दिला भर

अंशिकाचा UPSC प्रवास सोपा नव्हता. विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता स्व-अभ्यासावर भर दिला. पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यानंतर अनेकजण खचून जातात, पण अंशिकाने हार मानली नाही. त्यांनी आपल्या चुका ओळखून अभ्यासाची रणनीती बदलली आणि पुन्हा नव्या जोमाने तयारी सुरू ठेवली. त्यांच्या या चिकाटीचे फळ त्यांना २०२१ मध्ये मिळाले, जेव्हा त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत १३६ वा क्रमांक पटकावला.

प्रशासकीय कारकीर्द

या यशानंतर त्यांची आयपीएस (IPS) साठी निवड झाली आणि त्यांना होमटाउन केडर, म्हणजेच उत्तर प्रदेश मिळाले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पोलीस सेवेत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. सुरुवातीला त्यांची नियुक्ती आग्रा येथील फतेहपूर सिक्री पोलीस स्टेशनमध्ये एसएचओ म्हणून झाली. त्यानंतर १८ डिसेंबर २०२३ रोजी त्यांची गोरखपूर येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Photo- IG/anshikaverma.ips
आयपीएस अधिकारी अंशिका वर्मा

त्यानंतर त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत त्यांना बढती देण्यात आली आणि बरेली येथे दक्षिण विभागाच्या एसपी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. सध्या त्या बरेली येथे अतिरिक्त एसपी म्हणून कार्यरत असून, आपल्या कामगिरीने त्या प्रशासनात वेगळी ओळख निर्माण करत आहेत.

Photo- IG/anshikaverma.ips
आयपीएस अधिकारी अंशिका वर्मा

‘सौंदर्य आणि बुद्धिमत्ता’

अंशिका वर्मा या केवळ एक यशस्वी अधिकारीच नाहीत, तर त्या ‘सौंदर्य आणि बुद्धिमत्ता’ यांचे उत्तम उदाहरण मानल्या जातात. सोशल मीडियावरही त्या सक्रिय असून, अनेक तरुणांना त्या त्यांच्या पोस्टद्वारे प्रेरणा देतात. त्यांच्या यशोगाथेतून एकच संदेश मिळतो तो म्हणजे, ‘अपयश आले तरी हार मानू नका; सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वास यामुळे कोणतेही स्वप्न साकार करता येते’.