IPS Aparna Kaushik Viral Video: महिला किती कर्तुत्वाने मोठी झाली तरी तिला हिणवण्याची संधी सोडली जात नाही, याचा एक दुःखद अनुभव सध्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला येत आहे. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरच्या पोलीस अधीक्षक अलीकडे ऑनलाईन ट्रोलिंगला बळी पडल्या आहेत. मिर्झापूर पोलिसांनी एका गुन्हेगाराला यशस्वीरित्या अटक केल्यानंतर त्याची माहिती व्हिडीओद्वारे देत असताना त्यांच्या व्हिडीओवर चुकीच्या प्रतिक्रिया उमटल्या.
पोलिसांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्याऐवजी अनेकांनी महिला अधिकाऱ्याबद्दल अनुचित आणि अपमानजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आयपीएस अधिकारी अपर्णा कौशिक यांच्या शरीरावर चुकीच्या प्रतिक्रिया दिल्यानंतर आता वाद निर्माण झाला आहे. आक्षेपार्ह टिप्पण्या रोखण्यासाठी पोलीस विभागाने व्हिडीओवरील कमेंट्स बंद केल्या आहेत.
या घटनेमुळे आता सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. अनेकांनी अपमानास्पद टिप्पण्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा सायबरबुलिंग, लैंगिक भेदभाव आणि सोशल मीडियावरील उत्तरदायित्वाची गरज यावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे.
एका युजरने म्हटले, “जर अशा प्रकारच्या अपमानास्पद कमेंट एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याबद्दल व्यक्त केल्या जात असतील तर कल्पना करा की, सामान्य महिलांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत असेल. कृपया जरा सभ्यपणे वागा आणि महिला अधिकाऱ्यांबद्दल जरा अभिमान बाळगा.”
कोण आहेत अपर्णा कौशिक?
अपर्णा कौशिक या भारतीय पोलीस सेवेतील (IPS) २०१८ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्या सध्या मिर्झापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी उत्तर प्रदेशच्या पोलीस दलातील विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांचा प्रतिबंध यावर त्यांनी अधिक लक्ष दिले होते.
पोलीस सेवेत रूजू होण्यापूर्वी अपर्णा कौशिक गुरुग्राममधील एका खासगी कंपनीत व्यावसायिक विश्लेषक म्हणून काम करत होत्या. त्यांना सुमारे १८ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळत होते. चांगले करिअर असूनही त्यांनी नागरी सेवेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
मूळच्या रामपूरच्या असलेल्या अपर्णा कौशिक यांचा जन्म ७ मार्च १९९१ साली झाला होता. लहानपणापासून त्यांचा शैक्षणिक प्रवास अतिशय चांगला होता. त्या अभ्यासात हुशार होत्या. २००६ साली त्यांनी इयत्ता दहावीच्या बोर्ड परिक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्यांनी जयपूरमध्ये उच्च शिक्षण घेतले. अलाहाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी बी.टेकची पदवी मिळवली.
