IPS Bushra Bano Transfer controversy: पश्चिम बंगालमधील आयपीएस अधिकारी डॉ. बुशरा बानो यांच्या एका यूट्यूब व्हिडीओनंतर वेगळाच वाद उफाळला आहे. पश्चिम बंगाल सरकारने जनहिताचे कारण देऊन डॉ. बानो यांच्यासह दोन पोलीस अधिकाऱ्यांची बदली केली आहे. डॉ. बानो यांनी यूट्यूबवरील एका व्हिडीओमध्ये त्यांच्या वैयक्तिक प्रवासाविषयी माहिती दिली होती. तसेच या व्हिडीओच्या सुरुवातीला त्यांनी ‘अस्सलामु अलैकुम’ आणि इतर शब्द उच्चारल्यामुळे हिंदू संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.
हिंदू लीगल फंड नावाच्या संघटनेने एक्सवर यासंबंधी पोस्ट करून तक्रारीची माहिती दिली. पश्चिम बंगालच्या गृह खात्याच्या सचिव संघमित्रा घोष यांच्याकडे त्यांनी तक्रारीचे निवेदन दिले आहे. ज्यात डॉ. बानो या तटस्थता आणि राष्ट्रीय अभिव्यक्ती राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.
व्हिडीओमध्ये काय म्हणाल्या?
आयपीएस अधिकारी डॉ. बुशरा बानो व्हिडीओच्या सुरुवातीला ‘अस्सलामु अलैकुम’ म्हणतात. त्यानंतर त्या यूपीएससीच्या प्रवासाबद्दल माहिती देतात. “२०२१ साली आपण आयपीएस म्हणून निवडले गेलो असून सध्या खरगपूर जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असल्याचे त्या म्हणाल्या. सौदी अरेबियातून परतल्यानंतर आपण यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. सुरुवातील स्वंयअध्ययनावर भर दिल्यानंतर उत्तर प्रदेशमधील अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील रेसिडेन्शियल कोचिंग ॲकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. या संस्थेंच्या ग्रंथालयात खूप पुस्तके आहेत. इतरांना याचा लाभ व्हावा, म्हणून हा व्हिडीओ मी करत आहे”, असे डॉ. बानो म्हणाल्या.
हिंदू संघटनेचा दावा काय?
हिंदू लीगल फंडने गृह सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले, “महिला अधिकाऱ्याने व्हिडीओमध्ये ‘वंदे मातरम’ किंवा ‘जय हिंद’ म्हणण्याऐवजी ‘अस्सलामु अलैकुम’ म्हटले. त्यानंतर त्यांनी ‘इन्शाअल्लाह’ शब्दाचा वापर केला. तसेच व्हिडीओ संपताना त्यांनी जझाक अल्लाह असे म्हटले. एक सरकारी अधिकारी या नात्याने त्यांनी जन संवाद करताना तटस्थता आणि राष्ट्रीय अभिव्यक्ती राखणे आवश्यक होते. मात्र यात त्या अपयशी ठरल्यामुळे याची चौकशी करण्यात यावी.”
बदली आणि त्यानंतर झालेल्या सोशल मीडियावरील टीकेनंतर द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी डॉ. बानो यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला.
दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपा सरकारवर यावरून टीका केली. त्या म्हणाल्या, “ज्या देशात पंतप्रधान नव्या संसदेचे उद्घाटन करताना सेंगोल हाती घेतात आणि उघड्या छातीच्या साधूंकडून पूजा करून घेतात, त्या देशात एका मुस्लीम आयपीएस अधिकाऱ्याने ‘अस्सलामु अलैकुम’ आणि ‘इन्शाअल्लाह’ म्हटल्यामुळे कारवाई केली जात आहे. हे हास्यास्पद आहे. आपला देश द्वेष आणि विषारी कट्टरतेने ग्रासला असून आता देवच त्याचे रक्षण करो.”
