गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यात समोर आलेल्या एका प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. आयपीएस अधिकारी राहुल बन्सल यांच्यावर तब्बल एक कोटी रुपयांच्या लाचेचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ५०० रुपयाची देखील लाच घेऊ नका किंवा देऊ नका असे लेक्चर हे अधिकारी देत होते.
तसेच प्रशासनातील सुधारणांबाबत ते कायम मत मांडताना दिसत होते. मात्र, आता याच आयपीएस अधिकाऱ्यावर तब्बल एक कोटींची लाच घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर आयपीएस बन्सल यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
एका सायबर फ्रॉड प्रकरण मिटवण्यासाठी व आरोपींवर कारवाई न करण्यासाठी संबंधित आयपीएस अधिकाऱ्याने तब्बल एक कोटींची रक्कम लाच म्हणून उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत आयपीएस अधिकारी बन्सल यांच्यासह आणखी काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
आयपीएस बन्सल यांनी काय प्रतिक्रिया दिली?
“ही तक्रार सध्या न्यायालयाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे न्यायालय आणि कायद्यावर माझा पूर्ण विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया देत आयपीएस बन्सल यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
बन्सल यांनी म्हटलं की, “जुलै २०२५ मध्ये सरगुजा सायबर पोलीस ठाण्यात एका सायबर फ्रॉडमध्ये सुमारे २१ लाख रुपयांच्या कथित फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान असं आढळून आलं की, एक संघटित टोळी, जी सुरुवातीला दुबईतून कार्यरत होती. नंतर भारतात स्थलांतरित झाली. सोशल मीडियावरील जाहिरातींद्वारे लोकांना बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करत होती. या कंपनीने कथितरित्या फसवणुकीतून मिळालेली रक्कम रोख रकमेत रूपांतरित केली आणि त्यानंतर हवाला मार्गाद्वारे ती वळवली. या प्रकरणात आठ राज्यांमधून २३ आरोपींना अटक करण्यात आली होती आणि संबंधित न्यायालयात हजारो पानांची पाच आरोपपत्रे व डिजिटल पुरावे सादर करण्यात आलेले आहेत”
