अमेरिका-इराणमधील युद्धाचा वणवा पुन्हा पेटणार की युद्ध संपणार? याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. कारण अमेरिका-इराणमधील युद्ध संपवण्याबाबत अजून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. पाकिस्तानच्या माध्यमातून शांतता करारासाठी हालचाली सुरू आहेत. पण दुसऱ्या फेरीत देखील युद्धाबाबत ठोस तोडगा निघत नसल्याचं दिसून येत आहे. यातच अमेरिकेने काही दिवसांपासून होर्मुझ सामुद्रधुनीत नाकाबंदी सुरू केलेली आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत तणावाची परिस्थिती असल्याने होर्मुझ सामुद्रधुनीमधून होणाऱ्या जागतिक व्यापाराला अडथळे निर्माण होत आहेत. याचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे.
अशा परिस्थितीतही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज वेगवेगळे वक्तव्य करत इराणला इशारा देत असल्याने हे युद्ध पुन्हा भडकणार का? याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता इराणने अमेरिकेला युद्ध थांबवण्यासाठी १४ कलमी नवा शांतता प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या माध्यमातून इराणने हा प्रस्ताव दिला असून तात्पुरत्या युद्धविरामाऐवजी युद्ध पूर्णपणे संपवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त इराणमधील माध्यमांनी दिलं आहे.
इराणच्या नव्या प्रस्तावात काय आहे?
इराणने अमेरिकेला युद्ध थांबवण्यासाठी १४ कलमी नवा शांतता प्रस्ताव दिल्याचं वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. वृत्तानुसार, इराणने अमेरिकेकडे अशी मागणी केली की, ‘लेबनॉनसह सर्व युद्ध थांबवावं, नौदल नाकेबंदी हटवावी, संपूर्ण सैन्य मागे घ्यावं, इराणवरील सर्व निर्बंध हटवावेत, इराणची गोठवलेली मालमत्ता परत करावी, युद्धात झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी’, अशा विविध १४ अटी इराणने अमेरिकेला दिलेल्या प्रस्तावात ठेवल्या आहेत.
दरम्यान, इराणने अमेरिकेच्या दोन महिन्यांच्या युद्धविरामाच्या योजनेला विरोध केला आहे. इराणचे उप परराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी म्हटलं की,”वाटाघाटीतून तोडगा काढायचा की पुन्हा युद्धाकडे वळायचं हे अमेरिकेवर अवलंबून आहे. इराण दोन्हीसाठी तयार आहे.”
आयआरआयबी(इराणची सरकारी रेडिओ आणि दूरदर्शन संस्था) च्या वृत्तानुसार, मंत्री काझेम गरीबाबादी यांनी म्हटलं की, “आता मुत्सद्देगिरीचा मार्ग निवडायचा की संघर्षात्मक भूमिका कायम ठेवायची? हे अमेरिकेच्या हातात आहे. आपलं राष्ट्रीय हित आणि सुरक्षा जपण्याच्या उद्देशाने इराण दोन्ही मार्गांसाठी तयार असेल.”
इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेची भूमिका काय?
इराणने अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या ९-मुद्द्यांच्या प्रस्तावाला १४-मुद्द्यांच्या विस्तृत योजनेद्वारे अधिकृतपणे उत्तर दिलं आहे. पाकिस्तानी मध्यस्थाच्या माध्यमातून पाठवण्यात आलेला हा प्रतिसाद तात्पुरत्या युद्धविरामाच्या पलीकडे जाऊन संघर्षावर सर्वसमावेशक तोडगा काढण्याचा इराणचा मानस दर्शवतो.
यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “इराणच्या बाबतीत आमची कामगिरी खूप चांगली आहे. त्यांना एक करार करायचा आहे. त्यांचा नेता कोण असेल हे ठरवणं त्यांना अवघड जात आहे. मी याचा विचार करत आहे. त्यांनी मला कराराच्या संकल्पनेबद्दल सांगितलं. ते आता मला त्यांची नेमकी भूमिका सांगणार आहेत. पण इराणने अद्याप किंमत चुकवलेली नाही. इराणने नुकत्याच पाठवलेल्या प्रस्तावाचे पुनरावलोकन मी लवकरच करणार आहे. पण मला वाटत नाही की मी तो प्रस्ताव मान्य करेन, कारण गेल्या ४५ वर्षांत इराणने मानवता आणि जगासाठी जे काही केलंय, त्याची त्यांनी किंमत चुकवलेली नाही.”
होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेने किती जहाजांवर कारवाई केली?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीत नाकाबंदी करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे इराण आणि अमेरिकेच्या तणावात आणखी भर पडली होती. अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदीची घोषणा केल्यापासून आतापर्यंत किती जहाजांवर कारवाई केली? याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

इराणच्या सागरी मालमत्तेवरील निर्बंधांशी संबंधित अंमलबजावणीच्या कारवाईचा भाग म्हणून अमेरिकेने गेल्या २० दिवसांत पर्शियन आखातातील विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून ४८ जहाजे वळवली आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) शनिवारी एक्सवरील एका पोस्टमध्ये दिली. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नाकेबंदीच्या काळात तैनातीचा भाग म्हणून अमेरिकेचं यूएसएस न्यू ऑरलियन्स (LPD-१८) हे जहाज अरबी समुद्रात कार्यरत आहे. या नाकेबंदीदरम्यान अमेरिकेचं यूएसएस न्यू ऑरलियन्स हे जहाज समुद्रात प्रवास करत आहे. गेल्या २० दिवसांत नाकेबंदीचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ४८ जहाजे वळवण्यात आली असल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली आहे.
होर्मुझसाठी इराणला टोल न देण्यासाठी अमेरिकेचा दबाव
होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास करण्यासाठी इराणला शुल्क दिल्यास निर्बंध लागू केले जातील, असा इशारा अमेरिकेने जहाजकंपन्यांना दिला आहे. यूएस ऑफिस ऑफ फॉरेन असेट्स कंट्रोलने शुक्रवारी हा इशारा जारी केल्यामुळे पश्चिम आशियातील तणावात भर पडली आहे. दरम्यान, अमेरिकेने नाकारलेल्या प्रस्तावात अणुकरारावर चर्चा सुरू करण्यापूर्वी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा प्रस्ताव होता, अशी माहिती इराणच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
युद्ध सुरू झाल्यापासून इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक जवळपास बंद केली. त्यानंतर त्यांनी जहाजवाहतुकीवर शुल्क आकारण्याची घोषणा केली. हे शुल्क रोकड, डिजिटल, ऑफसेट, अनौपचारिक देवाणघेवाण किंवा देणग्या आणि इराणच्या दूतावासांमध्ये देयकांसह अन्य प्रकारच्या देयकांच्या स्वरूपात स्वीकारले जाईल, असे इराणने जाहीर केले आहे. इराणच्या या कृतीला उत्तर म्हणून अमेरिकी नौदलाने १३ एप्रिलपासून इराणच्या बंदरांची नाकेबंदी केली. आतापर्यंत ४८ व्यावसायिक जहाजे परत पाठवल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली आहे. यामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प आहे. या जलमार्गाने जगातील जवळपास २० टक्के कच्चे तेल आणि वायूची वाहतूक होते.
