Detailed history of Iran Air Flight 655 shoot down by US Navy : इराणविरोधातील युद्ध पेटलं आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना इराणनेही चोख प्रत्युत्तर दिलंय. या युद्धामुळे तिन्ही देशांसह जगातील अनेक देशांचं अतोनात नुकसान होतंय, तरीही युद्धसमाप्ती दृष्टीपथात आलेली नाही. दरम्यान, या युद्धात होणाऱ्या एअर स्ट्राइकच्या चर्चा होत असतानाच विसाव्या शतकात होर्मुझच्या सामुद्रधुनीत झालेली भीषण विमान दुर्घटना अद्यापही विस्मृतीत गेलेली नाही. अमेरिकेने चुकून डागलेल्या क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात तब्बल २९० निष्पाप प्रवाशांच मृत्यू झाला होता. १९८८ साली नेमका काय थरार झाला होता, हे पाहूयात.
१९८८ साली विसाव्या शतकातील सर्वांत भीषण विमान दुर्घटना घडली होती. ही दुर्घटना केवळ अपघाती नसून युद्धाचा थरारा अन् चुकीच्या अंदाजामुळे ओढावलेली शोकांतिका होती. ३ जुलै १९८८ रोजी, इराण एअरचे फ्लाईट ६५५ हे नागरी विमान अमेरिकेच्या नौदलाच्या ‘आयएनएस विन्सेनेस’ (USS Vincennes) या मार्गदर्शित क्षेपणास्त्र नौकेने पाडले. या घटनेत ६६ मुलांसह विमानातील सर्व २९० प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
अमेरिकेच्या चुकीमुळे विमान पाडले
एअरबस ए ३०० ने बंदर अब्बास येथून उड्डाण केले होते आणि ते दुबईकडे जाणाऱ्या नियमित मार्गावर होते. हे विमान एका नियुक्त नागरी हवाई क्षेत्रातून उडत होते आणि आपली ओळखही प्रसारित करत होते. असे असूनही, इराण-इराक युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात तणावपूर्ण वातावरणात काम करणाऱ्या विन्सेनेसच्या कर्मचाऱ्यांनी या विमानाला चुकून इराणचे ‘एफ-१४’ लढाऊ विमान समजले.
त्या काळात पर्शियन आखातातील व्यापारी जलमार्गांच्या संरक्षणासाठी अमेरिकन नौदल मोठ्या प्रमाणावर तैनात होते. घटनेच्या दिवशी, विन्सेनेस नौकेची इराणी गनबोट्ससोबत चकमक सुरू असतानाच हे विमान रडारवर दिसले. या विमानाला धोका समजून आणि इशाऱ्यांना स्पष्ट प्रतिसाद न मिळाल्याचे कारण देत, कमांडिंग ऑफिसर विल्यम सी. रॉजर्स तिसरे यांनी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा मारा करण्याचा आदेश दिला. या आदेशाची अंमलबजावणी होताच विमान हवेतच कोसळले आणि समुद्रात पडले.
दुर्दैवी चूक
वॉशिंग्टनने या घटनेचे वर्णन उच्च-दबावाच्या युद्ध परिस्थितीत चुकीच्या ओळखीमुळे झालेली ‘दुर्दैवी चूक’ असे म्हटलं. तर, क्रूने स्वसंरक्षणासाठी ही कारवाई केल्याचा दावा केला. तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी याला “भयंकर मानवी शोकांतिका” म्हटलं. पण तरीही जहाजाची कृती संरक्षणासाठी आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.
इराणचा संताप
दुसरीकडे, तेहरानने (इराण) या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. हा हल्ला हेतुपुरस्सर आणि अन्यायकारक असल्याचे सांगत त्यांनी याला ‘मानवतेविरुद्धचा गुन्हा’ संबोधले. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले. इराणने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले आणि १९९६ मध्ये अमेरिकेने कायदेशीर जबाबदारी स्वीकारली. तसंच, बळींच्या कुटुंबांना भरपाई देण्याचे मान्य केले. अनेक दशकांनंतरही, फ्लाईट ६५५ पाडले जाणे ही अमेरिका-इराण संबंधांमधील एक निर्णायक घटना मानली जाते. ही अशी शोकांतिका आहे जी आजही दोन्ही राष्ट्रांमधील अविश्वास आणि भू-राजकीय तणावाला कारणीभूत ठरत आहे.
