अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या लष्कराने अमेरिकन सैनिकाला ठार मारणाऱ्या किंवा पकडून इराणच्या ताब्यात देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अशी कारवाई एखाद्या महिलेने केल्यास ते बक्षीस दुप्पट करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
इराणच्या सरकारी वृत्तसंस्था आयआरएनएनुसार, इराणचे लष्करप्रमुख अमीर हातमी यांनी रविवारी ही माहिती दिली. आर्थिक मदतीसाठी मोठ्या संख्येने विनंत्या आल्यानंतर ही योजना तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हातमी यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या अमेरिकन सैनिकाला ठार मारणाऱ्या किंवा पकडून इराणच्या ताब्यात देणाऱ्या व्यक्तीला बक्षीस दिले जाईल.
महिलांनी कारवाई केल्यास दुप्पट बक्षीस
या घोषणेतील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे महिलांसाठी जाहीर करण्यात आलेले दुप्पट बक्षीस. हातमी यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या इराणी महिलेने अमेरिकन सैनिकाला पकडले किंवा अशी कारवाई केली, तर तिला दुप्पट रक्कम देण्यात येईल. मात्र, हे बक्षीस नेमके कुठे आणि कोणत्या परिस्थितीत लागू होईल, याबाबत हातमी यांनी कोणतेही स्पष्ट माहिती दिली नाही.
दरम्यान, इराणमध्ये अमेरिकेचे सैन्य मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले नसल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये एका अमेरिकन वैमानिकाच्या बचावासाठी करण्यात आलेल्या मोहिमेचा अपवाद वगळता, इराणमधील अमेरिकन सैनिकांची उपस्थिती मर्यादित असल्याचे सांगण्यात आले आहे.
अमेरिका-इराण युद्ध
अमेरिका आणि इराणमधील युद्ध २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्याने सुरू झाले होते. या युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्लाह अली खामेनी मारले गेले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात इराणने इस्रायल आणि शेजारील अरब देशांमधील अमेरिकन तळांवर हल्ले केले होते.
होर्मुझ सामुद्रधुनी ठरतेय मोठा अडथळा
अमेरिका आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनी हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. जगातील तेल आणि गॅसच्या व्यापारातील मोठा हिस्सा या जलमार्गातून जात असल्याने व्यापारी जहाजवाहतुकीसाठी हा मार्ग महत्वाचा आहे. युद्धादरम्यान या मार्गावरील व्यावसायिक जहाजांच्या वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तेल आणि गॅसच्या किमती तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारावर दबाव निर्माण झाला.
अमेरिका आणि इराणदरम्यान यापूर्वी युद्धविराम आणि चर्चेचे प्रयत्न झाले असले तरी ते टिकले नाहीत. त्यानंतर दोन्ही देशांकडून अधूनमधून हल्ले आणि प्रत्युत्तरात्मक कारवाया सुरू आहेत. हे हल्ले प्रामुख्याने दक्षिण इराण आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या परिसरात होत असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर इराणकडून अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी आर्थिक बक्षीस जाहीर केल्याचा दावा दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढवणारा ठरू शकतो.
