Iran Attack Bahrain UAE, IRGC claims responsibility for missile and drone strikes on major industrial hubs: मध्य-पूर्वेतील युद्ध आता केवळ लष्करी तळांपुरते मर्यादित राहिले नसून, इराणने थेट आर्थिक आणि औद्योगिक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) बहरीनमधील ‘ॲल्युमिनियम बहरीन’ (Alba) आणि संयुक्त अरब अमिरातीमधील ‘एमिरेट्स ग्लोबल ॲल्युमिनियम’ या दोन महाकाय प्रकल्पांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे संयुक्त आणि लक्ष्यित कारवाई केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
बहरीनमधील ‘अल्बा’ प्रकल्पावर हल्ला
‘बहरीन न्यूज एजन्सी’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘अल्बा’ कंपनीने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यात कंपनीचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, “आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सध्या आम्ही सुविधेच्या नुकसानीचे मूल्यमापन करत असून कामकाजाची लवचिकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत.”
इराणचा खळबळजनक दावा
इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, ‘आयआरजीसी’ने हा हल्ला जाणीवपूर्वक केला आहे. इराणचा आरोप आहे की, बहरीन आणि अमिरातीमधील हे ॲल्युमिनियम प्रकल्प अमेरिकन संरक्षण उत्पादनाशी जोडलेले आहेत. हे उद्योग अमेरिकन लष्करी आणि एरोस्पेस क्षेत्राला कच्चा माल आणि तांत्रिक पाठिंबा देतात, असा दावा इराणने केला आहे. ‘अमेरिकन-झायोनिस्ट’ सैन्याने इराणच्या औद्योगिक पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्यांचा हा बदला असल्याचे ‘आयआरजीसी’ने स्पष्ट केले.
संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे
‘आयआरजीसी’ने इशारा दिला आहे की, इराणचा हा प्रत्युत्तरात्मक हल्ला आक्रमकतेच्या कोणत्याही पातळीच्या पलीकडे जाईल. विरोधकांशी संबंधित असलेल्या कोणत्याही आर्थिक आणि लष्करी मालमत्तेला इराण आता सोडणार नाही, अशी धमकीही देण्यात आली आहे.
ॲल्युमिनियम हे विमाननिर्मिती आणि लष्करी उपकरणांसाठी अत्यंत महत्त्वाचे धातू आहे. आखाती देशांतील या दोन मोठ्या प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर ॲल्युमिनियमच्या किमती भडकण्याची शक्यता आहे. तसेच, यामुळे पश्चिम आशियातील तणाव अधिक वाढला असून, अमेरिका आणि इराणमधील थेट युद्धाची शक्यता आता अधिक गडद झाली आहे.
