वृत्तसंस्था, लंडन
अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धामध्ये पश्चिम आशियातील अमेरिकी तळांची अभूतपूर्व हानी झाल्याचे वृत्त ‘सीएनएन’ने प्रसिद्ध केले आहे. उपग्रह प्रतिमा आणि प्रत्यक्ष दृश्यांचा वापर केलेल्या या वृत्तानुसार, अमेरिकेच्या शस्त्रसामग्रीबरोबरच अत्याधुनिक यंत्रणा अंशतः किंवा पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात इराणला यश आले आहे.
अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना उत्तर देताना इराणने शेजारील अरब देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे धोरण अवलंबले. त्यामध्ये कुवेत, कतार, बहारिन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती यासह आठ देशांमधील किमान १६ लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले आहे. कुवेतमधील ‘कॅम्प ब्युरिंग’ हा अमेरिकेचा लष्करी तळ युद्ध सुरू होण्यापूर्वी सैनिकांनी आणि त्यांच्या विविध उपक्रमांनी गजबजलेला असे. तो आता शांत आहे, तिथे कोणीही नाही. कतारमधील ‘अल उदेद’ हवाई तळावर दोनदा हल्ला करण्यात आला. येथील युद्ध कक्षातून अमेरिका २९ देशांच्या संपर्कात असे. अमेरिकी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराणच्या हल्ल्यात याही तळाचे लक्षणीय नुकसान झाले. हा कक्ष आता हलवण्यात आला आहे. कुवेतच्या ‘कॅम्प अरिफजान’ या तळावर इराणच्या हल्ल्यात डेटा पाठवण्यासाठी अत्यावश्यक असलेले अनेक रडार डोम उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे हवाई संरक्षणासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक रडार प्रणालीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
उपग्रह प्रतिमांवरून इराणने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केल्याचे दिसत आहे. त्यात अमेरिकेच्या हवाई तळांवर मोठे खड्डे पडले आहेत आणि बांधकामाचे नुकसान झआले आहे. लष्करी विमाने आणि अन्य साधनसामग्री नष्ट झाली किंवा त्यांचे मोठे नुकसान झाले. या घडामोडींची माहिती असलेल्या एका सूत्राने ‘सीएनएन’ला सांगितले की, “मी यासारखे नुकसान याआधी कधीही पाहिले नाही. लक्ष्यांवर वेगाने आणि अचूक हल्ले करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.” इराणने २९ मार्चला सौदी अरेबियातील प्रिन्स सुल्तान हवाई तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेच्या ‘ई-३ सेंट्री एडब्ल्यूएसीएस’ या लढाऊ विमानाचे नुकसान झाले. त्यात अमेरिकेचे पाच लाख डॉलरचे नुकसान झाले.
इराणच्या या युद्धसज्जतेला चीनने सढळ हाताने मदत केल्याचे दिसून आले आहे. ‘फायनान्शिअल टाइम्स’ने दोन वर्षांपूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, चीनने इराणला गोपनीयरित्या ‘टीईई-०१बी’ हा उपग्रह दिला. यामुळे शत्रूच्या हालचाली टिपण्याची इराणची क्षमता कितीतरी अधिक प्रमाणात वाढल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
