वॉशिंग्टन : इराण-अमेरिकेदरम्यान शस्त्रसंधी लागू असताना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणार्‍या जहाजावर हल्ला करण्याचे इराणचे कृत्य मूर्खपणाचे असल्याची टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी केली. तैवानच्या ‘एव्हरग्रीन मरीन’च्या सिंगापूर ध्वजाखाली असलेले जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना ते ओमानजवळ आले असता, गुरुवारी हा हल्ला करण्यात आला होता. नंतर हे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मार्गस्थ झाले.

जहाजावरील गोळीबारामुळे पश्चिम आशियातील शांतता धोक्यात आणली असल्याचे ट्रम्प म्हणाले. इराणचे कृत्य हे शस्त्रसंधीचे उल्लंघन आहे, असे ते म्हणाले. इराणने शुक्रवारी होर्मुझ सामुद्रधुनीतून होणार्‍या सागरी वाहतुकीचे नियंत्रण करण्याचा आपल्याला हक्क आहे, असा पुन्हा दावा केला. अमेरिका आणि सहा आखाती देशांनी संयुक्त निवेदनात ‘होर्मुझ’मधील सागरी वाहतुकीवर टोल लावण्याचा आग्रह फेटाळून लावल्यानंतर इराण संतप्त झाला.

या कृतीला इराणने बेजबाबदार, प्रक्षोभक आणि हस्तक्षेपाची कृती संबोधले आहे. दुसरीकडे, इराणने आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी अस्तित्वालाही आव्हान दिले आहे. अमेरिकेची या ठिकाणी असणारी उपस्थिती प्रादेशिक असुरक्षा आणि मतभेदांना कारणीभूत ठरत असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.