Iran Saudi US Air Base Attack News: IRGC launches 29 drones and 6 ballistic missiles targeting US assets: इराणने अमेरिकेकडून ऑपरेट केल्या जाणाऱ्या सौदी अरेबियातील एका हवाई तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला केल्याचा दावा शुक्रवारी केला आहे. या हल्ल्या सर्व्हेलन्स एअरक्राफ्टसह इतर लष्करी मालमत्तांचे नुकसान झाल्याचे इराणने म्हटले आहे.
इराणच्या प्रेस टीव्ही या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रिन्स सुलतान एअर बेस’ला लक्ष्य करत हा हल्ला करण्यात आला. या तळावर अमेरिकेचे लष्कर तैनात आहे. या हल्ल्यात ‘बोईंग ई-३ सेंट्री एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) विमान आणि अनेक रिफ्युलिंग विमानांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
प्रेस टीव्हीने जारी केलेल्या फोटोंमध्ये विमानाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत असून, रिपोर्टनुसार विमानाचा केवळ सांगाडा शिल्लक राहिल्याचा दावा करण्यात आला आहे. इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात ६ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि २९ ड्रोन्सचा वापर करण्यात आला.
एसोशिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात किमान १० अमेरिकन अधिकारी जखमी झाले आहेत, ज्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर आहे. मात्र युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडने अद्याप या घटनेबद्दल कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.
इराणने दिली माहिती
इराणची सरकारी वृत्तवाहिनी प्रेस टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, ही मोहीम इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) पार पाडली. ज्यामध्ये सहा लाँग रेंज मिसाईल सिस्टम आणि ड्रोन्सचा वापर करण्यात आला.
या रिपोर्टमध्ये असाही दावा केला की इराणी लष्कराने एक यूएस एमक्यू-९ ड्रोन पाडले आणि एका एफ-१६ लढाऊ विमानावर देखील हल्ला केला. मात्र या दाव्याची स्वतंत्र्यपणे पुष्टी झालेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इराणने संयुक्तपणे इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर हा संघर्ष सुरू झाला होता. या संघर्षात आतापर्यंत या प्रदेशातील एकमेकांच्या अनेक लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत हल्ले करण्यात आले आहेत.
दरम्यान सौदीमधील हवाई तळावर झालेले नेमके नुकसान किंवा जीवितहानी याबाबत अमेरिकन प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
