Iran attacks US Aircraft Carrier Abraham Lincoln : अमेरिका आणि इस्रायलने इराणमध्ये मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सुरू केल्यानंतर इराणनेही याविरोधात हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी सलग दुसऱ्या दिवशी मध्य पूर्व तणावपूर्ण राहिले. दरम्यान, इराणच्या रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सने सांगितले की त्यांनी अमेरिकन विमानवाहू जहाज अब्राहम लिंकनवर चार बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली, असे इराणी राज्य माध्यमांनी वृत्तसंस्थेला सांगितले. मात्र, यूएस सेंट्रल कमांडने म्हटले आहे की “इराणी क्षेपणास्त्र या जहाजाच्या जवळही आले नाही.”
खामेनी यांच्या हत्येनंतर लगेचच इराणने प्रत्युत्तर म्हणून इस्रायल आणि आखाती अरब राष्ट्रांमध्ये क्षेपणास्त्रांचा मारा केला. दुबई, अबुधाबी, दोहा आणि मनामा या मध्यपूर्वेतील देशांमध्ये जिथे अमेरिकन सैन्य तैनात आहे, तिथेही स्फोटांचे आवाज ऐकू आले. तेहरानने इस्रायल आणि अमेरिकन सैन्याच्या अनेक मध्यपूर्वेतील तळांना लक्ष्य करून क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे आज संपूर्ण प्रदेशात सुमारे १३ जणांचा मृत्यू झाला. अनेक अहवालांनुसार, इस्रायलमध्ये ९, युएईमध्ये ३ आणि कुवेतमध्ये एकाचा मृत्यू झाला.
इस्रायली सैन्याने असा दावाही केला की त्यांनी पश्चिम आणि मध्य इराणमधील बहुतेक हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्या आहेत. हे हल्ले तेहरानवर हवाई श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी होते. तर, तेहरानमध्ये झालेल्या स्फोटाचे उद्दिष्ट लगेच कळू शकले नाही. त्यामुळे धुराचे मोठे लोट आकाशात पसरले. वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसने वृत्त दिले आहे की, देशाचे पोलिस मुख्यालय, इराणी राज्य दूरचित्रवाणी, क्रांतिकारी न्यायालय आणि संरक्षण मंत्रालयाची इमारत असलेल्या परिसरात हा स्फोट झाला.
अयातुल्ला अराफी इराणचे सर्वोच्च नेते
दरम्यान, अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर इराणने ज्येष्ठ धर्मगुरू अयातुल्ला अलिरेझा अराफी यांची अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली आहे. अधिकाऱ्यांनी संविधानाच्या कलम १११ चा वापर करून आपत्कालीन व्यवस्था सुरू केली ज्या अंतर्गत तीन सदस्यांची परिषद कायमस्वरूपी उत्तराधिकारी निवडेपर्यंत सर्वोच्च नेत्याचे अधिकार स्वीकारते.
