Iran attacks US Military Base in Saudi Arabia damaging critical surveillance radar systems : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष कधी थांबणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यादरम्यान इराणने नुकतेच सौदी अरेबिया येथील एका लष्करी तळावरील अमेरिकेच्या हवाई दलाचे E-3 सेंट्री विमान उद्ध्वस्त केले आहे. त्यानंतर तज्ज्ञांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या एका मीडिया रिपोर्टमध्ये असा इशारा देण्यात आला आहे की, या घटनेमुळे इराणकडून येणारा धोका दूर अंतरावर असतानाच ओळखण्याच्या अमेरिकेच्या लष्करी क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

इरणाने २७ मार्च रोजी केलेल्या हवाई हल्ल्यात सौदी अरेबियाच्या अल खर्ज येथील प्रिन्स सुलतान एअर बेसवरील अमेरिकेची ‘एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम’ (AWACS) उद्ध्वस्त झाली आहे. या लष्करी तळावरील फोटो समोर आले असून त्यामध्ये -3 सेन्ट्री (E-3 Sentry) विमानाचे दोन तुकडे झाल्याचे समोर आले आहे.

इराणने केलेल्या या हल्ल्यात किमान १२ अमेरिकन सैनिक जखमी झाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. अमेरिकन हवाई दलाचे टँकर एअरक्राफ्टचेही नुकसान झाल्याचे वृत्त सीएनएनने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

या विमानाचा अनुभव असलेले अमेरिकेचे निवृत्त एअर फोर्स कर्नल सेड्रिक लेटन (Cedric Leighton) यांनी सीएनएनशी बोलताना सांगितले की, AWACS विमान गमावणे हा, ‘अमेरिकेच्या सर्व्हेलन्स क्षमतांना एक मोठा धक्का’ आहे. ते पुढे म्हणाले की, यामुळे लढाऊ विमानांचे नियंत्रण करणे किंवा शत्रूची विमाने आणि क्षेपणास्त्र प्रणाली यांच्यापासून त्यांचे संरक्षण करण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

AWACS रडार सिस्टम काय आहे?

एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) हा एक रडारने सुसज्ज असलेला हवाई प्लॅटफॉर्म आहे. जो लांब अंतरावर असलेली विमाने, जहाजे आणि क्षेपणास्त्रांचा शोध घेणे, त्यांचा मागोवा घेणे आणि त्यांची ओळख पटवण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे, पाळत ठेवणे, युद्धाचे नियोजन करणे आणि लढाऊ विमानांवर नियंत्रण ठेवणे यासाठी हवेत उडणारे कमांड सेंटर म्हणून हे काम करते, याला बोईंग E-3 सेंट्री या नावाने ओळखले जाते.

AWACS जमिनीपासून ते स्ट्रॅटोस्पियरपर्यंत जवळपास तब्बल १२०००० चौरस मैलांच्या युद्धक्षेत्रावर हवेतून पाळत ठेवू शकते. गेल्या अनेक दशकांपासून युद्धात सहभागी झालेल्या अमेरिकन सैन्यासाठी हा एक महत्त्वाचा घटक राहिला आहे.

बोईंग E-3 सेंट्री एअरक्राफ्ट

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या ताफ्यात असलेली १७ E-3 विमाने अमेरिकेसाठी जमेची बाजू आहेत. कारण यांच्यामुळे शत्रूकडून येणाऱ्या धोके जमिनीवरील रडारच्या तुलनेत कित्येक पट आधी लक्षात येतात.

“सध्याच्या संघर्षात, जमिनीवरील रडारच्या तुलनेत E-3 हे २०० मैल अंतरावरून डागलेले इराणचे शाहेद (Shahed) ड्रोन कदाचित तब्बल ८५ मिनिटे आधीच पाहू शकते,” असे रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्सचे माजी अधिकारी पीटर लेइटन (Peter Layton) यांनी स्पष्ट केले. सीएनएनने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, AWACS ही यंत्रणा नवीन संघर्षाच्या ठिकाणी खूपच कमी वेळात पोहचू शकते. तसेच जमिनीवरील रडार यंत्रणेच्या तुलनेत याला लक्ष्य करणे शत्रू राष्ट्रांसाठी तेवढे सोपे ठरत नाही.

बोईंग E-3 सेंट्री आणि AWACS यात फरक आहे?

बोईंग E-3 सेंट्री आणि AWACS यात फारसा फरक नाही. बोईंग E-3 सेंट्री हे एका विशिष्ट विमानाचे मॉडेल आहे, तर AWACS (एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम) हे त्याच्या रडार आणि कमांड क्षमतेसाठी वापरण्यात येणारे नाव आहे. E-3 ही एक बोईंग ७०७ विमानाची एअरफ्रेम असून त्यावर एक रोटोडोम बसवलेले असतो, हे विमान हवेत उडणारे कमांड सेंटर म्हणून काम करते. त्याच्या कामाचे वर्णन करण्यासाठी ‘AWACS’ हा शब्द अनेकदा समानार्थी म्हणून वापरला जातो.

E-3
अमेरिकेच्या हवाई दलाच्या ताफ्यात अशी १६ विमाने आहेत. (फोटो सौजन्य: af.mil)

E-3 विमान ही आकाशातील एक शक्तीशाली कमांड पोस्ट आणि सर्व्हेलन्स प्लॅटफॉर्म आहे. हे विमान एकाच वेळी तब्बल ६०० लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकते. यामध्ये विमाने, क्षेपणास्त्रे, मोठे ड्रोन्स आणि अगदी युद्धभूमीवरील टँक यांचा देखील समावेश आहे.

E-3 या विमानात असलेले अधिकारी ही माहिती प्रत्यक्ष युद्धभूमीवरील धोक्यात असलेल्या कमांडर्सना, समुद्रातील जहाजांना किंवा थेट पेंटागॉनला पाठवू शकतात. तर, AWACS मध्ये असलेले कंट्रोलर्स इंटरसेप्टर फायटर जेट्सना त्यांच्याकडे येत असलेल्या धोक्यांबद्दल माहिती देऊ शकतात किंवा जमिनीवर लढत असलेल्या सैन्याच्या मदतीसाठी लढाऊ विमाने पाठवू शकतात