तेहरान/वॉशिंग्टन: इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मध्य पूर्वेतील अमेरिकन सैनिकी तळांवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे संघर्ष वाढला असून त्याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थला बसला आहे.

इराणच्या हल्ल्यानंतर सौदी अरेबियातील सरकारी मालकीच्या अरामकोच्या रास तनुरा रिफायनरीला तात्पुरते बंद करावे लागले. हल्ल्याच्या बातमीनंतर ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमती ९.३२ टक्क्यांनी वाढल्या, तर जागतिक बाजारात अस्थिरता दिसून आली. मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे भारतातील शेअर बाजार कोसळले

गल्फमधील सर्व व्यावसायिक उड्डाणे स्थगित करण्यात आली असून आतापर्यंत ६००० उड्डाणे रद्द करण्यात आली. अमेरिकन तळांवरील हल्ल्यांमध्ये काही लष्करी विमाने कोसळली; मात्र विमानातील सैनिक सुरक्षित असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विशेषत: इराणने बहरीन, कुवेत, युएई आणि इराकमधील तळांना लक्ष्य केल्याने अमेरिकन सैन्य सतर्क झाले आहे. जागतिक तेल पुरवठ्यावरही परिणाम झाला असून, हा संघर्ष जागतिक बाजारासाठी गंभीर आव्हान ठरला आहे. तणावामुळे जागतिक वित्तीय बाजार, विमान उद्योग आणि तेल कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. इराणने सौदी अरेबियातील सरकारी मालकीच्या सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या रास तनुरा तेल शुद्धीकरण प्रकल्पावर (रिफायनरी) ड्रोन हल्ला केला. हल्ल्यानंतर अरामकोने सोमवारी या रिफायनरीला तात्पुरते बंद केले. या बंदीच्या बातमीनंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ९.३२ टक्क्यांनी वाढल्या.

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, इराणने मध्य पूर्वेतील किमान सहा अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले.
बहरीन, इराक, युएई आणि कुवेतमधील अमेरिकी तळांवर हल्ला झाला. कुवेतमधील संरक्षण मंत्रालयाने सांगितले की अनेक अमेरिकी लष्करी विमाने कोसळली; मात्र सर्व सैनिक सुरक्षित आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्यातील २५५ प्रवासी दुबई—अबुधाबीत अडकले, १२७ उड्डाणे रद्द

इस्रयल, अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षाचे पडसाद जागतिक हवाई वाहतुकीवर उमटू लागले असून मध्यपूर्वेतील तणावामुळे महाराष्ट्रातील सुमारे २५५ पर्यटक आणि विद्यार्थी दुबई, अबुधाबी येथे अडकले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव दुबईसह काही प्रमुख विमानतळांवरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आल्याने प्रवाशांना हॉटेलमध्ये थांबावे लागत आहे. इराणकडून संयुक्त अरब अमिरात तसेच काही आखाती देशांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाल्यानंतर दुबई, अबुधाबी आणि शारजाह येथील विमानतळांवरील सेवा विस्कळीत झाली. परिणामी अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली.