Iran’s Ballistic Missiles Attack On Israel: इराणकडून इस्रायलवर शुक्रवारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे इस्रायली सैन्याने स्पष्ट केले आहे. “काही वेळापूर्वी, इराणकडून इस्रायलकडे डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांची ओळख पटल्यानंतर इस्रायलमधील अनेक भागात सायरन वाजले,” असे लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे.

टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, दक्षिणेकडील बेरशेबा परिसरात व तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये असंख्य स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आले. या वृत्तात पुढे म्हटले आहे की, या हल्ल्यामुळे हैफामध्ये दोन जण जखमी झाले आहेत, ज्यात एका किशोरवयीन मुलाचा समावेश आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इस्रायल पोलिसांनी काही ठिकाणी हल्ला झाल्याची पुष्टी केली, परंतु त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली नाही. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात लष्करी संघर्ष सुरू असून, यामध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक जखमी झाले आहेत.

इस्रायलच्या लष्कराने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी तेहरानमधील डझनभर लक्ष्यांवर रात्री हल्ला केला असून, त्यामध्ये इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पाच्या संशोधन आणि विकास केंद्राचाही समावेश आहे. दरम्यान, इराणच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री त्यांनी इस्रायलवर १०० हून अधिक लढाऊ आणि आत्मघातकी ड्रोन सोडले आहेत.

इराण-इस्रायल यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यापासून इस्रायलमध्ये किमान २५ लोकांचा मृत्यू झाला असून, २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, इस्रायली हल्ल्यात २२४ इराणी लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रविवारपासून इराणने आपल्या नागरिकांच्या मृतांची अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांना वाटाघाटीची अपेक्षा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ते पुढील दोन आठवड्यांत इराणवरील इस्रायलच्या हल्ल्यात सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय घेतील, कारण हा संघर्ष संपवण्यासाठी वाटाघाटी होण्याची अजूनही शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इराकमध्ये इराणच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

शुक्रवारच्या नमाजानंतर हजारो इराकी लोकांनी इराणला पाठिंबा देण्यासाठी बगदादच्या सदर सिटी आणि इतर शहरांमध्ये एकत्र येत अमेरिका आणि इस्रायलविरोधी घोषणा दिल्या. यावेळी निदर्शकांनी या संघर्षात इराण विजयी होईल अशी आशा व्यक्त केली. याचबरोबर त्याने इराक सरकारला इरानला आर्थिक आणि लष्करी मदत देण्याचे आवाहन केले.