US Defense Secretary Pete Hegseth on Ceasefire: अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाल्यानंतर आता अमेरिकेकडून यावर विविध प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. थोड्यावेळापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी युद्धबंदीबाबत संवाद सुरू असून युरेनियमच्या समृद्धीकरणाला आमचा विरोध असल्याचे म्हटले. त्यानंतर अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनीही युद्धविरामावर भाष्य करताना इराणनेच अगतिक होत युद्ध थांबविण्याची याचना केली होती, असे म्हटले.

पीट हेगसेथ म्हणाले, इराण खूप अपमानित झाला होता आणि त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरला नव्हता. त्यांचे नेतृत्व कुचकामी ठरल्यानंतर आणि लष्कर निष्प्रभ ठरल्यानंतर इराणने दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची याचना केली.

पेटांगॉन येथे माध्यमांशी बोलत असताना पीट हेगसेथ म्हणाले, इराणने युद्ध थांबविण्यासाठी अशरशः विनवणी केली होती. आता त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरला नसल्यामुळे आणि वेळ जात असल्यामुळे इराणने वाटाघाटी करण्यासाठी होकार दर्शवला. इराणच्या नव्या राजवटीला हे कळून चुकले की, भविष्यात जे वाढून ठेवले आहे, त्यापेक्षा करार करणे कधीही चांगले ठरेल. इराणचे लोक अपमानित झाले असून त्यांचे खच्चीकरण झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे युद्धबंदीशिवाय पर्याय नव्हता.

पीट हेगसेथ पुढे म्हणाले, इराणने जर अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारला नसता तर आम्ही इराणचे वीज प्रकल्प, पूल आणि तेल व ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले असते. या प्रकल्पांची पुन्हा उभारणी करण्यासाठी इराणला अनेक दशके लागली असती. हेच इराणच्या नव्या राजवटीने ओळखले आणि करारासाठी संमती दर्शवली.

ट्रम्प यांनी करुणेचा मार्ग निवडला

इराणची संपूर्ण अर्थव्यवस्था काही मिनिटांत उध्वस्त करण्याची शक्ती राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे आहे. पण ट्रम्प यांनी करुणेचा मार्ग निवडला, असेही पीट हेगसेथ यावेळी म्हणाले. “इराणने आता युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकारल्यामुळे शांततेचा मार्ग खुला झाला आहे. पण पुन्हा संघर्ष उडाल्यास अमेरिकेचे सैनिक त्याला प्रत्युत्तर देण्यास तयार असतील. नव्या राजवटीकडे कोणताही पर्याय आणि वेळ उरला नव्हता.

इराणची लष्करी क्षमता नष्ट

अमेरिकेने इराणची लष्करी उत्पादन क्षमता नष्ट केली असून ते आता क्षेपणास्त्रे, रॉकेट्स, ड्रोन किंवा यूएव्ही बनवू शकणार नाहीत, असाही दावा हेगसेथ यांनी केला. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेने सुरू केलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरीने इराणवर निर्णायक असा विजय मिळवला आहे. मंगळवारी अमेरिकेने एका रात्रीत इराणवर ८०० हल्ले केले. इराणचे अनेक कारखाने या हल्ल्यांमध्ये जमीनदोस्त करण्यात आले, असाही दावा त्यांनी केला.