Iran On Hormuz Warning : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटलं आहे. अमेरिका-इस्रायल हे संयुक्तपणे इराणवर हल्ले करत असल्यामुळे इराण हादरलं आहे. या युद्धात आतापर्यंत इराणच्या शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एवढंच नाही तर इराणच्या अनेक नेत्यांचा आणि लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. पण तरी हे युद्ध अद्यापही थांबलेलं नाही.
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या व्यापारात अडथळे निर्माण होत असून याचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रोज इराणला धमकी देणारे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची चिन्ह दिसून येतात.
दरम्यान, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याच्या अनुषंगाने डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा देत ४८ तासांत सामुद्रधुनी खुली करण्याची धमकी दिली होती. पण या धमकीमुळे इराणने संताप व्यक्त केला आणि त्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिका आणि इस्रायल वगळता बाकी सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय घेतल्यानंतर काही तासांतच आता पुन्हा एकदा याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
‘…तर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करणार’
‘अमेरिकेने इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला करण्याच्या धमक्यांची अंमलबजावणी केली तर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली जाईल’, असा मोठा इशारा इराणने रविवारी दिला आहे. इराणच्या खतम अल-अंबिया (Khatam al-Anbiya) या लष्करी कमांड युनिटने हा इशारा दिला आहे.
“जर इराणचे वीज प्रकल्प उद्धवस्त करण्याच्या अमेरिकेने दिलेल्या धमक्यांची अंमलबजावणी झाली तर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली जाईल आणि जोपर्यंत आमचे नष्ट झालेले वीज प्रकल्प पुन्हा बांधले जात नाहीत तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी सुरू केली जाणार नाही”, असं इराणच्या लष्करी कमांड युनिटने सरकारी टिव्हीवर प्रसारित केलेल्या एका निवेदनात म्हटल्याचं न्यूज १८ ने एका वृत्तात म्हटलं आहे.
“४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा…”, ट्रम्प यांनी दिला होता इशारा
अमेरिका आणि इस्रायल युद्धामुळे जगभरात ऊर्जा पुरवणाऱ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जलमार्ग म्हणजेच होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्येही मोठा तणाव आहे. त्यामुळे जागतिक व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, ही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा दिला होता. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटलं की, “जर हा जलमार्ग पुढच्या ४८ तासांत कोणत्याही धोक्याशिवाय पूर्णपणे खुला झाला नाही, तर अमेरिका इराणच्या सर्वात मोठ्या वीज प्रकल्पापासून सुरुवात करून विविध ऊर्जा प्रकल्पांना उद्ध्वस्त करेल.”
