Iran Captures US Navy Dive LD Submarine: इराणी नौदलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकी लष्कराची सर्वात आधुनिक मानवरहित पाणबुडी पकडल्याचा दावा केला आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सची अधिकृत वृत्तवाहिनी असलेल्या सिपाह न्यूजने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. इराणी नौदलाने एका गुप्तचर मोहिमेत डायव्ह-एलडी मानवरहित पाणबुडी ताब्यात घेतल्याचे या निवेदनात म्हटले आहे. ही पाणबुडी पाळत ठेवण्यासाठी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

जप्त पाणबुडीचा व्हिडीओ केला प्रसिद्ध

अमेरिकेची ही पाणबुडी जगातील सर्वात आधुनिक सबसरफेस तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याचे सांगत, जप्त केलेल्या पाणबुडीचा एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे. आयआरजीसीने एका वेगळ्या निवेदनात त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर एक एक्यु-९ रिपर ड्रोन पाडले असा दावा केल्याचे वृत्त सिपाह न्यूजने दिले आहे. आयआरजीसीने केलेल्या दाव्यानंतर पाळत ठेवणाऱ्या एका ड्रोनमध्ये (पाणबुडी) बिघाड झाल्याचे सांगितले. मात्र, जप्त करण्यात आलेला ड्रोन तोच आहे की नाही याचा उल्लेख केला नाही.

पेंटागॉनकडून स्पष्टीकरण

पेंटागॉनकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. “हा ड्रोन पाळत ठेवण्यासाठी वापरला जात होता. बिघाड झालेले ड्रोन हे एका जुन्या मॉडेलचे होते, ज्यामध्ये कोणताही संवेदनशील डेटा गोळा केला जात नव्हता तसेच, त्यात सोनार किंवा रडार उपकरण नव्हते”, असे पेंटागॉनच्या एका प्रवक्त्याने स्पष्ट केले.

अमेरिकेने काय म्हटले आहे?

समोर आलेल्या माहितीनुसार, महासागरावर नजर ठेवणे, गुप्तचर माहिती गोळा करणे आणि खलाशांचा जीव धोक्यात न घालता शत्रूची जहाजे व पाणबुड्यांचा माहिती घेणे यासाठी स्वस्त पर्याय म्हणून अमेरिकी लष्कर मानवरहित नौदलात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. अँडुरिलच्या वेबसाइटनुसार, ‘डायव्ह-एलडी’ बेसवर न परतता १० दिवसांपर्यंत काम करू शकते आणि ६,००० मीटर खोलीपर्यंत जाण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ‘डिफेन्सस्कूप’ या अमेरिकन लष्करी वृत्तसंस्थेने २०२४ मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्येक डायव्ह-एलडी युनिटची किंमत सुमारे २५ लाख डॉलर्स आहे.

इराणचे पाच कच्चे तेलवाहू टँकर नष्ट केल्याचा दावा

दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने देखील इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने अमेरिकेच्या युद्धनौकेवर हल्ला केल्यानंतर त्यांच्या सैन्याने इराणचे पाच कच्चे तेलवाहू टँकर नष्ट केल्याचा दावा केला आहे. गेल्या दोन दिवसात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी युद्धनौकेवर हल्ला करण्याच्या इराणकडून प्रयत्न झाला, याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने हे हल्ले केल्याचे सेंटकॉमने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.