US-Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध अद्यापही सुरूच आहे. याच युद्धात काही दिवसांपूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. एवढंच नाही तर आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका-इस्रायल हे देश इराणवर जोरदार हल्ले करत आहे, तर इराणही जोरदार प्रतिहल्ले करत असल्याने युद्ध आणखी भडकण्याची चिन्ह आहेत.
यातच इराणने अयातुल्ला अली खामेनी यांचा उत्तराधिकारी निवडला असल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याच्या नावावर एकमत झालं आहे. देशाच्या पुढील सर्वोच्च नेत्याची निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे. म्हणजे इराणचे नवे सर्वोच्च नेते कोण? यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नसून ही घोषणा लवकरच केली जाईल. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
वृत्तानुसार, इराणच्या ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स'(Assembly of Experts) सभेने इराणचा पुढचा सर्वोच्च नेता निवडला आहे. या पदासाठी सर्वात योग्य उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. मात्र, नाव जाहीर करण्याचं आता तणावाच्या पार्श्वभूमीवर टाळल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, इस्रायलशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नेतृत्व बदल घडत असल्याने सर्वोच्च नेत्याला इराण पुन्हा लक्ष्य करू शकतो म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. कारण इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी यापूर्वीच म्हटलं होतं की जर इराणने इस्रायलशी संघर्ष सुरू ठेवला तर अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर येणारा जो कोणी सर्वोच्च नेता असेल त्याला संपवण्यासाठी लक्ष्य असेल. या इशाऱ्यामुळे आता इराण योग्य ती खबरदारी घेत असल्याचं दिसून येत आहे.
इराणने खामेनींच्या उत्तराधिकाऱ्याचं नाव गुप्त का ठेवलं?
इराणने खामेनींच्या उत्तराधिकाऱ्याची निवड केली आहे. मात्र, निवड करूनही नाव जाहीर केलेलं नाही. सुरक्षा आणि चिंता व राजकीय संवेदनशीलतेमुळे हा निर्णय घेतला गेल्याचं सांगितलं जात आहे. कारण इस्रायलने दिलेल्या इशाऱ्यांनुसार खामेनींच्या कोणत्याही उत्तराधिकाऱ्याला लक्ष्य केलं जाऊ शकतं.
