US F 35 damaged: इराणच्या हल्ल्यादरम्यान अमेरिकेच्या एका एफ-३५ लढाऊ विमानावर निशाणा साधण्यात आला असून, त्याला मध्यपूर्वेतील एका लष्करी तळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने (आयआरजीसी) केलेला हा दावा खरा ठरल्यास, मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेच्या सर्वात प्रगत आणि महागड्या लढाऊ विमानांपैकी एकावर झालेला हा पहिलाच हल्ला ठरेल. याबद्दलची बातमी ‘सीएनएन’ने दिली आहे.
‘आयआरजीसी’च्या म्हणण्यानुसार, गुरुवारी पहाटे मध्य इराणमध्ये हवाई संरक्षण प्रणालीद्वारे या स्टेल्थ जेटवर हल्ला करण्यात आला. ‘तेहरान टाइम्स’ने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, इराणी हवाई हद्दीत लढाऊ मोहिमेदरम्यान एफ-३५ विमानावर हल्ला झाल्याचा क्षण दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये विमानाला नुकसान झाल्याचे, स्फोट, धुराचे लोट आणि हवेत मार्ग भरकटल्याचे दृश्य दिसत असल्याचे सांगितले जाते.
एका निवेदनात आयआरजीसीने म्हटले आहे की, पहाटे सुमारे २.५० वाजता (स्थानिक वेळेनुसार) या विमानावर हल्ला करण्यात आला आणि त्याला गंभीर नुकसान पोहोचले. विमानाचे नेमके काय झाले हे अद्याप स्पष्ट नसले तरी ते कोसळले असण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आयआरजीसीने असेही सांगितले की, १२५ हून अधिक अमेरिकी-इस्रायली ड्रोन रोखल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, ही इराणच्या सुधारित हवाई संरक्षण क्षमतेचे उदाहरण आहे.
पहिलीच घटना असेल
या घटनेची पुष्टी झाल्यास, एफ-३५ या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाला इराणने यशस्वीरित्या लक्ष्य केल्याची ही पहिलीच घटना ठरेल. या विमानाची किंमत १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक असून, ते अमेरिकेच्या हवाई शक्तीचा कणा मानले जाते. २८ फेब्रुवारीपासून वाढलेल्या संघर्षात अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी एफ-३५ विमानांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे.
अमेरिका काय म्हणाली?
दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने ‘सीएनएन’ला दिलेल्या माहितीनुसार, हे विमान इराणवरील लढाऊ मोहिमेदरम्यान आपत्कालीन लँडिंग करण्यास भाग पडले. प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी सांगितले, “विमान सुरक्षितपणे उतरले असून वैमानिकाची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे.”
१६ अमेरिकी विमाने नष्ट!
मात्र, वॉशिंग्टनकडून अद्याप अधिकृत सविस्तर निवेदन जारी करण्यात आलेले नाही. पेंटागॉनने आपली कारवाई नियोजनानुसार सुरू असल्याचे म्हटले आहे. संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी दावा केला की, अमेरिका निर्णायक आघाडीवर आहे आणि इराणची हवाई संरक्षण यंत्रणा मोठ्या प्रमाणात निष्प्रभ झाली आहे. दरम्यान, वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, युद्धाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत किमान १६ अमेरिकी विमाने नष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. यात १० रीपर ड्रोनचा समावेश असून, इतर काही विमाने लढाईत किंवा अपघातांमध्ये नुकसानग्रस्त झाली आहेत.
