Iran’s IRGC Navy claims a precision strike on USS Abraham Lincoln: इराणने अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका USS अब्राहम लिंकनवर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या नौदलाने लिंकनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला करुन, युद्धनौकेला माघार घेण्यास भाग पाडले, असे वृत्त इराणच्या प्रेस टीव्हीने प्रसिद्ध केले आहे. पण, अमेरिकेने इराणचा दावा खोटा असल्याचे म्हटले असून, युद्धनौका सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.
इराणचा दावा काय?
इराणच्या पैगंबर केंद्रीय मुख्यालयाने याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. “ओमान समुद्रात असणाऱ्या अब्राहम लिंकन युद्धनौकेवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या मदतीने अचूक हल्ला करण्यात आला. ही युद्धनौका इराणच्या सागरी सीमेपासून सुमारे ३४० किलोमीटर अंतरावर होती”, असे मुख्यालयाने म्हटले आहे. हल्ला झाल्यानंतर युद्धनौकेने पळ काढला असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. पण, इराणने हल्ल्याच्या दाव्याला सिद्ध करणारा ठोस पुरावा सादर केलेला नाही.
अमेरिकेने फेटाळला दावा
अब्राहम लिंकन युद्धनौकेवर हल्ला केल्याचा इराणने दावा केल्यानंतर अमेरिकेने लगेचच याला उत्तर देत दावा खोटा असल्याचे सांगितले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने युद्धनौकेचा फोटो प्रसिद्ध करत ती सुरक्षित असल्याचे सांगितले. नौका ऑपरेशन एपिक फ्युरीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असल्याचेही अमेरिकेने नमूद केले.
इराणी जहाजावर हल्ला केल्याचा अमेरिकेचा दावा
सीबीसीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या नौदलाने जवळ येऊ पाहणाऱ्या इराणी नौकेवर हल्ला केला. पण, इराणी नौकेला काही इजा झाली अथवा नाही? याची पुष्टी करता आली नसल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सीबीसीला माहिती देताना म्हटले. इराणकडून देखील त्यांच्या जहाजाबद्दल कुठलीही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
अमेरिकेची लिंकनबरोबर आणखी दोन जहाजं तैनात
अरबी समुद्रात तैनात असलेल्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन जहाजाबरोबर यूएसएस स्प्रुअन्स आणि यूएसएस मायकल मर्फी या दोन युद्धनौका देखील तैनात करण्यात आल्या आहेत. अमेरिकेने गेल्या आठवड्यात अरबी समुद्रात आणखी सहा क्षेपणास्त्र विनाशक तैनात केल्याची माहिती आहे.
