Iran US Conflict F-18 Fighter Jet shot down claim fact check : गेल्या काही आठवड्यांपासून मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष सुरू आहे. या दरम्यान नुकतेच इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) त्यांनी अमेरिकेचे एफ-१८ फायटर जेट (F/A-18 Hornet)ला यशस्वीपणे पाडल्याचा दावा केला आहे.
एकीकडे अमेरिकन लढाऊ विमानाला ‘यशस्वीपणे लक्ष्य’ केल्याचा दावा आयआरजीसीने (IRGC) केला आहे, मात्र नेमके ठिकाण, किती नुकसान झाले किंवा वैमानिकाचे पुढे काय झाले याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे अमेरिकन लष्कराकडून या वृत्ताला अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. विशेष म्हणजे, याआधीही संघर्षादरम्यान इराणने केलेले असे दावे अमेरिकेने फेटाळून लावले होते.
जरी इराणने ‘एफ-१८’ विमान पाडल्याचा दावा केला असला, त्यांना रोख हा F/A-18 या विमानाकडे असावा. कारण अमेरिकन लष्कराकडे अधिकृतपणे ‘एफ-१८’ या नावाचे कोणतेही विमान नाही. F/A-18 हे ट्विन इंजिन, कॅरियर क्षमता असलेले मल्टिरोल लढाऊ विमान आहे.
इराणने व्हिडीओ केला शेअर
इराणचे सरकारशी संबंधित वृत्तवाहिनी प्रेस टीव्हीने फुटेज शेअर केले आहे, ज्यामध्ये लढाऊ विमानाच्या जवळ एक फ्लॅश दिसून येतो, ज्यावरून विमानावर हवेतच हल्ला झाल्याचे सुचित होते. त्यानंतर काही क्षणांतच विमान अस्थिर झाल्यासारखे दिसते आणि विमानाचे नुकसान झाल्याचे किंवा त्यावरील नियंत्रण सुटल्याचे संकेत देणारी एक रेषा पाहायला मिळते. हा व्हिडीओ खूप लहान असला तरी, यामुळे आकाशात लढाई सुरू असल्याचा आभास निर्माण होतो. मात्र, या व्हिडीओची अद्याप कोणतीही स्वातंत्र्यपणे पडताळणी झालेली नाही.
व्हिडीओमध्ये पुढे विमानापासून काहीतरी वेगळे होताना दिसत आहे, ज्यावरून वैमानिकाने पॅराशूटच्या मदतीने विमानातून बाहेर उडी घेतल्याचे दिसून येते. विमान अनियंत्रित होऊन कोसळताना दिसते.
मुंबईतील इराणच्या कॉन्सुलेट जनरल यांनी देखील एक्स वर हा व्हिडीओ शेअर केला असून, अमेरिकेच्या एफ-१८ लढाऊ विमानाला इराणच्या इंटीग्रेटेड डिफेन्स सिस्टमने लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.
अमेरिकेने दावा फेटाळला
इराणचा दावा समोर आल्याच्या काही मिनिटांतच अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) एक ‘फॅक्ट-चेक’ केले आहे. ज्यामध्ये त्यांनी अमेरिकन फायटर जेट पाडल्याचा दावा फेटाळून लावला आहे. एक्सवर पोस्ट करत अमेरिकन लष्कराने इराणने अमेरिकेचे कोणतेही लढाऊ विमान पाडले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
