वृत्तसंस्था, कैरो, दुबई, वॉशिंग्टन

इराणशी संबंधित जहाजांची नाकेबंदी हटवणार नाही, असे अमेरिकेने शुक्रवारी जाहीर केल्यानंतर इराणने शनिवारी पुन्हा होर्मुझच्या सामुद्रधुनीवर निर्बंध लादले. यामुळे जहाजांच्या वाहतुकीमध्ये पुन्हा अडथळे निर्माण झाले आहेत. इराणने सामुद्रधुनी खुली केल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी जाहीर केली होती. मात्र इराण-अमेरिकेदरम्यान अणुकार्यक्रमासह करार होत नाही, तोपर्यंत नाकेबंदी लागू राहील, असेही अमेरिकेकडून सांगण्यात आले.

लेबनॉनस्थित आणि इराण-समर्थित हेजबोला आणि इस्रायलदरम्यान १० दिवसांचा शस्त्रविराम जाहीर झाल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे पुन्हा खुली केल्याची घोषणा केली होती. त्यातच अमेरिका आणि इराण यांच्यात करार होण्याची शक्यता वाढल्याने त्या आशेवर शुक्रवारी तेलाचे दर कमी होऊ लागले. मात्र ट्रम्प आणि त्यापाठोपाठ इराणच्या घोषणेमुळे जागतिक अर्थव्यवस्थाला हादरवून सोडणारे ऊर्जा संकट अधिक गंभीर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जगातील सुमारे २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. सोमवारी नाकेबंदी सुरू झाल्यापासून अमेरिकी सैन्याने २१ जहाजे इराणला परत पाठवली आहेत, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.

इराणच्या लष्कराने संयुक्त लष्करी कमांडने शनिवारी सांगितले की, ‘‘होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रण पूर्ववत करण्यात आले आहे. ते सशस्त्र दलांच्या कठोर व्यवस्थापन आणि नियंत्रणाखाली आहे.’’ अमेरिकेची इराणी बंदरांवरील नाकेबंदी कायम असेपर्यंत या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक रोखली जाईल, असा इशाराही इराणच्या लष्कराने दिला आहे.

लेबनॉनमध्ये विस्थापित घरी परतण्यास सुरुवात

इस्रायल आणि हेजबोलादरम्यान शुक्रवारी १० दिवसांचा शस्त्रविराम जाहीर झाल्यानंतर लेबनॉनची राजधानी बेरुतमधील विस्थापित कुटुंबे पुन्हा आपापल्या घरी परतण्यास सुरुवात झाली आहेत. शस्त्रविराम कायम राहील की नाही, हे स्पष्ट झाल्याशिवाय घर सोडून गेलेल्यांनी परत येऊ नये असा इशारा लेबनॉनमधील अधिकार्‍यांनी दिला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून नागरिक आपापल्या घराकडे परतण्याचा प्रयत्न करत आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये २२९०पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो विस्थापित झाले आहेत. त्याशिवाय दक्षिण लेबनॉन आणि राजधानी बेरुतचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

समृद्ध युरेनियम अमेरिकेला देण्यास नकार

इराणचे परराष्ट्र उपमंत्री सईद खातिबजादे यांनी अमेरिकेला कोणत्याही प्रकारे समृद्ध युरेनियम देणार नसल्याचे शनिवारी सांगितले. तुर्कीमधील अंताल्या शहरात खातिबजादे यांनी सांगितले की, ‘‘इराण अमेरिकेशी समोरासमोर चर्चेच्या नवीन फेरीसाठी तयार नाही, कारण अमेरिकेने त्यांची अतिरेकी भूमिका सोडलेली नाही.’’ अमेरिका इराणकडील सर्व आण्विक सामग्री प्राप्त करेल असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी केला होता. इराणमध्ये ४४० किलो समृद्ध युरेनियम जमिनीखाली पुरलेल्या अवस्थेत आहे.

चर्चेबद्दल अनिश्चितता

अमेरिका आणि इराणदरम्यानचा शस्त्रसंधी बुधवारी संपणार आहे. युद्धसमाप्तीच्या करारासंदर्भात पाकिस्तानात आतापर्यंत चर्चेची एक फेरी पार पडली आहे. दुसरी फेरी याच आठवड्याच्या अखेर होण्याची अपेक्षा होती, पण अद्याप त्यासंबंधी कोणतीही घोषणा झालेली नाही. दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर तीन दिवसांचा इराण दौरा आटोपून मायदेशी परतले आहेत. तर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार हे सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांशी विचारविनिमय करत आहेत.

इराणची हवाई हद्द अंशत: खुली

= इराणने आपली हवाई हद्द अंशत: खुली करत असल्याची घोषणा शनिवारी केली. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर २८ फेब्रुवारीला हल्ले सुरू केल्यानंतर इराणने हवाई हद्द बंद केली होती. इराणच्या नागरी हवाई संघटनेने सांगितले की, पूर्व इराणवरील हवाई हद्द स्थानिक वेळेनुसार शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून खुली करण्यात आली. देशाच्या विमानतळांवरील वाहतूक हळूहळू सुरू करण्यात येईल, असे या संस्थेकडून सांगण्यात आले.

जहाजांच्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह

युद्ध सुरू झाल्यापासून शनिवारी पहिल्यांदाच आठ तेलवाहू जहाजांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक सुरू केली. ‘मरिनट्रॅफिक डेटा’ने दिलेल्या माहितीनुसार, चार एलपीजीवाहू आणि अनेक तेल उत्पादन आणि रसायनवाहू जहाजे इराणच्या हद्दीतून जात आहेत. आखाती देशांकडून आणखी जहाजांनी वाहतूक सुरू केल्याचेही ‘मरिनट्रॅफिक’ने म्हटले आहे. तर, कतारमधून पाच एलएनजीवाहू जहाजे सामुद्रधुनीच्या दिशेने येत असल्याचे ‘शिप-ट्रॅकिंग डेटा’वरून दिसत आहे. मात्र, आता या वाहतुकीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भारतीय जहाजांवर हल्ला

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणार्‍या दोन भारतीय जहाजांवर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने गोळीबार केला. यात कोणीही जखमी झाले नाही आणि जहाजांचे कोणतेही नुकसान झाले नाही, असे सूत्रांनी सांगितले. मात्र या घटनेनंतर या दोन्ही जहाजांनी माघारी फिरावे लागले. या घटनेचा भारताने तीव्र निषेध केला. इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फताली यांना बोलावून भारताने हा निषेध नोंदवत या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.