वृत्तसंस्था, मुंबई
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविषयी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीला इराणच्या मुंबई आणि हैदराबादमधील दूतावासांनी ‘एक्स’वरून उत्तर दिले आहे. समाजमाध्यमांवर या उत्तरांची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी मारले गेल्यानंतर भारताने सहा दिवसांनी अधिकृतपणे शोक व्यक्त केला होता.
ट्रम्प यांनी भारत आणि चीनचा ‘नरकाचे द्वार’ असा उल्लेख करणारा एक लेख समाजमाध्यमावर प्रसिद्ध केल्यानंतर भारतामध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. परराष्ट्र मंत्रालयाने त्याला उत्तर देताना ‘हे भारताविषयी अज्ञानातून केलेले केलेले अयोग्य विधान’ असल्याचे म्हटले होते. दुसरीकडे इराणच्या हैदराबादमधील वाणिज्य दूतावासाने एक पोस्ट लिहून भारत आणि चीनच्या प्राचीन संस्कृतीची प्रशंसा केली. “चीन आणि भारत हे प्राचीन संस्कृतीचे देश आहेत. वास्तवात ज्या युद्ध-गुन्हेगार अध्यक्षाने इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिली ते नरकाचे द्वार आहे,” असे दूतावासाने गुरुवारी लिहिलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
दुसरीकडे, इराणच्या मुंबईमधील वाणिज्य दूतावासाने शुक्रवारी महाराष्ट्राची वैशिष्ट्ये असलेली एक १८ सेकंदांची चित्रफीत प्रसिद्ध केली. “कोणीतरी ट्रम्प यांच्यासाठी एका दिवसाच्या सांस्कृतिक डिटॉक्सची नोंदणी करावी, त्यामुळे कदाचित त्यांची बाष्कळ बडबड कमी होईल,” असे या चित्रफितीबरोबर लिहिले आहे. “कधी भारतात येऊन पाहा, मग बोला,” असे त्यापुढे हिंदीत लिहिले आहे. या दोन्ही पोस्ट समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात सामायिक केल्या जात आहेत.
शहरांची स्पर्धा
गंमतीचा भाग म्हणजे यानंतर हैदराबाद दूतावास आणि मुंबई दूतावास यांच्यात कोणते शहर अधिक चांगले याची स्पर्धा सुरू झाली. “आम्हाला मुंबईत चहा आणि बनमस्का, वडा पाव आणि पावभाजी आवडते. पहिल्या तीन घासांतच मूड चांगला होतो,” असे हैदराबाद दूतावासाने लिहिले, “पण दक्षिण भारताची शानच वेगळी, हे अधिक सुंदर आहे,” अशी पुस्ती पुढे जोडली. त्यानंतर मुंबई दूतावासाने “आमच्याकडे समुद्र आहे,” असे म्हणत हैदराबाद दूतावासाला चिडवले. त्यावर, “आमच्याबरोबर मीमयुद्ध करू नका, दक्षिण भारताकडे आयटीची ताकद आहे,” असे उत्तर हैदराबाद दूतावासाने दिले. “येथील लोकांचे हृदयच सागरासारखे विशाल आहे,” असेही अन्य एका पोस्टमध्ये दूतावासाने लिहिले आहे. दोन्ही दूतावासांच्या या स्पर्धेत भारतीय जनतेचे मन जिंकण्याचा प्रयत्न दिसत आहे.
