Government clarifies Iran crude oil tanker reroute to China : इराणमधून कच्चे तेल घेऊन येणारा टँकर भारताऐवजी चीनकडे रवाना झाल्याचे वृत्त शुक्रवारी वाऱ्यासारखे पसरले. पैशांच्या व्यवहारामुळे हा टँकर चीनकडे वळाला असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, गुजरातच्या वाडिनार बंदराकडे निघालेले इराणचे कच्चे तेल वाहून नेणारे जहाज (ऑइल टँकर) पेमेंटच्या समस्येमुळे मध्यंतरीच चीनकडे वळवण्यात आल्याच्या वृत्ताचे भारताने शनिवारी खंडन केले आहे. जागतिक तेल व्यापारात प्रवासादरम्यान जहाजांचे मार्ग बदलणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे, असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.
‘पिंग शुन’ (Ping Shun)या अफ्रामॅक्स टँकरला २०२५ मध्ये अमेरिकेने निर्बंध लादले होते, ते गुजरातऐवजी आता चीनच्या डोंगयिंगकडे जात असल्याचे ‘केपलर’ (Kpler) या जहाज-ट्रॅकिंग संस्थेने शुक्रवारी सांगितले होते. २०१९ नंतर, म्हणजे तब्बल सात वर्षांनंतर इराणकडून भारतात येणारी ही पहिलीच खेप असण्याची शक्यता होती. मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक ऊर्जा व्यापारात निर्माण झालेल्या व्यत्ययांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने निर्बंधांमध्ये तात्पुरती सवलत दिल्यानंतर ही हालचाल सुरू झाली होती.
पेमेंटच्या समस्यांचे केंद्राने केले खंडन
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत स्पष्ट केले की, पेमेंटच्या अडचणींमुळे जहाजाचा मार्ग बदलल्याचे दावे वस्तुस्थितीला धरून नाहीत. इराणकडून कच्च्या तेलाच्या आयातीसाठी कोणतीही पैशांची अडचण नाही आणि भारतीय रिफायनर्स विविध जागतिक पुरवठादारांकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवणार आहेत.
मंत्रालयाने म्हटले आहे की, “भारत ४० हून अधिक देशांतून कच्च्या तेलाची आयात करतो. व्यावसायिक गरजांनुसार विविध स्त्रोतांकडून तेल घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य कंपन्यांना आहे. मध्यपूर्वेतील पुरवठा विस्कळीत झाला असतानाही, भारतीय रिफायनर्सनी इराणसह इतर ठिकाणांहून आपली गरज सुरक्षित केली आहे.”
जागतिक तेल व्यापारातील सामान्य प्रक्रिया
प्रवासादरम्यान जहाजांची गंतव्यस्थाने बदलणे ही उद्योगातील एक प्रमाणित पद्धत आहे. ‘बिल ऑफ लॅडिंग’मध्ये अनेकदा तात्पुरत्या बंदरांचा उल्लेख असतो आणि व्यावसायिक सोयीनुसार समुद्रमार्गे जाणारा माल मधूनच दुसऱ्या ठिकाणी वळवला जाऊ शकतो. भारताची कच्च्या तेलाची गरज पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही मंत्रालयाने सांगितले आहे. यासोबतच, ‘सी बर्ड’ (Sea Bird) नावाचे एक एलपीजी जहाज ४४,००० टन इराणी एलपीजी घेऊन २ एप्रिल रोजी मंगळूर बंदरात दाखल झाले असून, सध्या तिथून माल उतरवण्याचे काम सुरू असल्याची माहितीही सरकारने दिली आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
ऐतिहासिकदृष्ट्या, भारत हा इराणी कच्च्या तेलाचा मोठा खरेदीदार राहिला आहे. २०१८ मध्ये भारत दररोज ५,१८,००० बॅरल इराणी तेल खरेदी करत असे. मात्र, २०१९ मध्ये अमेरिकेने निर्बंध कडक केल्यानंतर ही आयात बंद झाली होती. गेल्या महिन्यात अमेरिकेने तेल दर कमी करण्यासाठी इराणी तेलाच्या खरेदीवर ३० दिवसांची सवलत दिली आहे, ज्याची मुदत १९ एप्रिल रोजी संपणार आहे. सध्या समुद्रात असलेल्या अंदाजे ९.५ कोटी बॅरल इराणी तेलापैकी ५.१ कोटी बॅरल भारत खरेदी करू शकतो, तर उर्वरित तेल चीन आणि आग्नेय आशियाई देशांसाठी अधिक उपयुक्त असल्याचे मानले जात आहे.
