मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणशी संबंधित हॅकर्सनी आता अमेरिकेच्या भूमीवर ‘अप्रत्यक्ष’ (Asymmetric) युद्ध पुकारले आहे. अमेरिकेतील तेल, वायू आणि पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या औद्योगिक प्रकल्पांना लक्ष्य करत हॅकर्सनी डेटा नष्ट करण्याचा आणि कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. या गंभीर प्रकारानंतर एफबीआय (FBI) आणि अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी देशभरातील पायाभूत सुविधा चालकांसाठी तातडीचा ईशारा दिला आहे.

सायबर हल्ल्याचे स्वरूप

अमेरिकेतील तेल आणि वायू कंपन्या तसेच पाणीपुरवठा केंद्रे लक्ष्य केली आहेत. हॅकर्सनी ‘प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर्स’ (PLC) या उपकरणांमधील त्रुटींचा फायदा घेतला, जी उपकरणे कारखान्यांमधील मशिनरी नियंत्रित करतात. अनेक औद्योगिक प्रक्रिया ‘ऑफलाइन’ गेल्यामुळे आर्थिक फटका बसला असून काही ठिकाणी कामकाज मॅन्युअली (हाताने) सुरू ठेवावे लागले. हॅकर्सनी कंपन्यांचा डेटा पूर्णपणे पुसून टाकण्यासाठी ‘वायपर’ (Wiper) नावाच्या घातक सॉफ्टवेअरचा वापर केल्याचा संशय आहे.

सुरक्षेचा प्रश्न आणि तज्ज्ञांचा इशारा

सायबर तज्ज्ञ जो स्लोविक यांच्या मते, हा केवळ तांत्रिक बिघाड नसून मानवी जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. सुरक्षिततेसाठी असलेल्या यंत्रणांशी छेडछाड केल्यामुळे प्लांटमध्ये स्फोट किंवा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या कंपन्यांनी आपल्या इंटरनेट-कनेक्टेड सिस्टिम्स अद्ययावत ठेवल्या नाहीत, त्यांना या हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

युद्ध आणि युद्धविरामाचा पेच

ही सायबर मोहीम अशा वेळी समोर आली आहे जेव्हा अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांचा युद्धविराम (Ceasefire) झाला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणच्या संस्कृतीला नष्ट करण्याची धमकी मागे घेतली असली तरी, ‘स्ट्रैट ऑफ हॉर्मुझ’ जवळ अमेरिकन युद्धनौका तैनात राहतील असे स्पष्ट केले आहे. अमेरिकेने पुकारलेल्या युद्धविरामाला इस्रायलने पाठिंबा दिला असला तरी लेबनॉनमधील हिजबुल्ला विरुद्धची मोहीम थांबवणार नसल्याचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी आव्हाने

युद्धविराम झाला असला तरी इराणचा अणू कार्यक्रम, निर्बंध हटवणे आणि अमेरिकन सैन्याची माघार यांसारख्या मुद्द्यांवरून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. दरम्यान, अबुधाबीतील एका गॅस प्रोसेसिंग प्लांटला इराणकडून झालेल्या हल्ल्यात आग लागल्याच्या वृत्ताने आखाती देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हॅकर्सनी गेल्या महिन्यात एफबीआय संचालक काश पटेल यांच्या खाजगी खात्यातून चोरलेले ईमेल लीक केले होते आणि यापूर्वी एका प्रमुख अमेरिकन वैद्यकीय उपकरण निर्मात्याच्या व्यवसायात व्यत्यय आणला होता.