Iran On Strait of Hormuz : गेल्या २० दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. अमेरिका-इस्रायल हे संयुक्तपणे इराणवर दररोज हल्ले करत आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत इराणच्या अनेक मोठ्या नेत्यांसह लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. मात्र, तरीही इराणने माघार घेतलेली नसून इराणही अमेरिका-इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ले करत आहे.
या युद्धामुळे जगभरात ऊर्जा पुरवण्यासाठी महत्त्वाचा असलेला जलमार्ग म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्येही तणाव आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याने जगातील अनेक देशांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा देत येत्या ४८ तासांत ही सामुद्रधुनी खुली करण्याची धमकी दिली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीनंतर इराणने सामुद्रधुनी खुली करण्याबाबत एक निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय घेत असताना अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी आता शत्रू देश (अमेरिका-इस्रायल) वगळता सर्वांसाठी खुली करण्याची घोषणा इराणने केली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना जाऊ देण्याबाबत आता इराणने नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
इराणने काय म्हटलं?
आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेतील इराणचे प्रतिनिधी अली मौसवी यांनी रविवारी याबाबत बोलताना म्हटलं की, “शत्रूंशी (संभाव्यतः अमेरिका आणि इस्रायल) संबंधित जहाजे वगळता हा जलमार्ग सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुला राहील. इराणच्या शत्रूंशी संबंधित नसलेली जहाजे तेहरानसोबत सुरक्षा आणि संरक्षणाच्या व्यवस्थेबाबत समन्वय साधून या सामुद्रधुनीतून जाऊ शकतात. तसेच सागरी सुरक्षा सुधारण्यासाठी आणि आखातातील खलाशांचे संरक्षण करण्यासाठी तेहरान संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेशी सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सध्याच्या परिस्थितीच्या मुळाशी इराणवरील इस्रायली आणि अमेरिकी हल्ले होत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.
? “If Iran doesn’t FULLY OPEN, WITHOUT THREAT, the Strait of Hormuz, within 48 HOURS from this exact point in time, the United States of America will hit and obliterate their various POWER PLANTS, STARTING WITH THE BIGGEST ONE FIRST…” – President DONALD J. TRUMP pic.twitter.com/htLz1A0Mf7
— The White House (@WhiteHouse) March 22, 2026
“४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा…”, ट्रम्प यांनी दिला होता इशारा
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर इराणने आखाती देशांची कोंडी केली. तसंच जगभरात ऊर्जा पुरवणाऱ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जलमार्ग म्हणजेच होर्मुझच्या सामुद्रधुनीवरही कब्जा मिळवून त्याचा मार्ग अडवून ठेवला. परिणामी जगभरातून संताप व्यक्त केला जातोय. कारण यामुळे इंधनांची कपात होऊन दर गगनाला भिडले आहेत. यावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आता थेट इशारा दिला. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटलं की, “जर हा जलमार्ग पुढच्या ४८ तासांत कोणत्याही धोक्याशिवाय पूर्णपणे खुला झाला नाही, तर अमेरिका इराणच्या सर्वात मोठ्या वीज प्रकल्पापासून सुरुवात करून विविध ऊर्जा प्रकल्पांना उद्ध्वस्त करेल.”
