इराणकडून अमेरिकेविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी, “देश अमेरिकेविरुद्ध पूर्णपणे युद्धात असून, यामुळे होणारे परिणाम स्वीकारायला हवेत”, असे वक्तव्य केले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सामंजस्य करार झाल्यानंतर काही दिवसातच पुन्हा चकमक उडाली, यानंतर आता इराणकडून पुन्हा युद्धाची घोषणा करण्यात आल्याने संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
इराणचे अध्यक्ष म्हणाले, ‘आम्ही सध्या युद्धात’
“खरी परिस्थिती अशी आहे की सध्या इराण पूर्णपणे युद्धात आहे. या युद्धामुळे होणारे परिणाम हे आपण तयार राहायला पाहीजे”, असे वक्तव्य मसूद पेझेश्कियान यांनी केले आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करणाऱ्या देशांनी १० दिवसांसाठी युद्धविराम जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे. यावर दोन्ही देशांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही, असे वृत्त ‘द टाईम्स ऑफ इस्रायल’ने प्रसिद्ध केले आहे. इराणकडून मुख्य मध्यस्थीची भूमिका बजावणारे मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी देखील संघर्ष समाप्त करण्याबाबत अमेरिका सकारात्मक नसल्याचे म्हटले आहे.
गालिबाफ यांनीही स्पष्ट केली भूमिका
“अमेरिका या भागात नव्याने लष्करी हत्यारं घेऊन येत आहे आणि त्यांना युद्ध समाप्त करायचंय असा दावा करातायेत”, असे मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्य पोस्टमध्ये म्हटले आहे.”अमेरिका करत असलेल्या या क्लुप्त्या आम्ही पहिल्यापासूनच ओळखून आहोत, त्यामुळेच आम्ही देखील तयार आहोत, करण्यात येणारे दावे कृतीतून दिसायला हवेत, त्यातून विरोधाभास निर्माण झाला नाही पाहिजे”, असेही गालिबाफ यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, वॉशिंगटन पोस्टच्या वृत्तानुसार, अमेरिका देखील इराणवरोधात संघर्ष तीव्र करण्याची तयारी करत आहे.
संघर्ष तीव्र होण्याची शक्यता
दरम्यान, आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका इराणविरोधात संघर्ष तीव्र करण्याची तयारी करत आहे. अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर लष्करी विमानं मध्य पूर्वेत पाठवत असल्याचे गालिबाफ यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत वॉशिंगटन पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे. अमेरिकेकडे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र अपुरी असून, इतर शस्त्रसाठा देखील मर्यादीत आहे. यापूर्वी झालेले नुकसान लक्षात घेता इराण मध्यपूर्वेत लष्कर देखील कमी प्रमाणात पाठविण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्ही देशातील संघर्ष निवळण्यासाठी मध्यस्थांकडून प्रयत्न सुरु असल्याची देखील माहिती आहे.
