Iran delegation travel security threat reasons : अमेरिका आणि इराण युद्ध थांबण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अमेरिकेने इराणविरोधातील युद्धात विराम घेतला. त्यानंतर पाकिस्तानातच शांतता चर्चा पार पडली. मात्र, या चर्चेत ठोस निर्णय घेण्यात आला नाही. दोन्ही देशांकडून अवाजवी मागण्या आल्याने चर्चा फिस्कटली. मात्र, चर्चा फिस्कटल्यानंतर इराणचे शिष्टमंडळ विमानाने आपल्या मायदेशी परतण्यापेक्षा ट्रेनने गेले. विमानाने जाणं त्यांना धोक्याचं वाटलं, असा दावा शिष्टमंडळाचा भाग असलेले मोहम्मद मरंदी यांनी केला आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

विमान हल्ला होण्याची शक्यता

प्रवासादरम्यान त्यांच्या विमानाला लक्ष्य केलं जाऊ शकतं, अशा सूचना इराणी शिष्टमंडळाला मिळाल्या होत्या, असं मरंदी म्हणाले. इराणच्या शिष्टमंडळात अब्बास अराघची आणि मोहम्मद बागेर गालिबाफ या ज्येष्ठ नेत्यांचा सहभाग होता. ही परिस्थिती अत्यंत गंभीर होती, त्यामुळे तातडीने पर्यायी निर्णय घेणे गरजेचे होते, असंही मरंदी म्हणाले. चर्चेतून कोणताही ठोस मार्ग न निघाल्याने, शिष्टमंडळाने परतताना नेहमीच्या हवाई मार्गावर अवलंबून न राहण्याचा निर्णय घेतला.

ट्रेन आणि बसने प्रवास

चर्चा संपल्यानंतर शिष्टमंडळाने परतीच्या प्रवासाचं साधन बदललं. विमानातून उड्डाणकरण्यासाठी राजधानी जाण्यापेक्षा ते मशहद येथे गेले. तिथून त्यांनी ट्रेनने तेहरानपर्यंत प्रवास केला. तसंच, रस्ते आणि भूमार्गांनी टप्प्याटप्प्याने त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि प्रवासाचा अंदाज कोणालाही येऊ नये, यासाठी हा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

सुरक्षेला प्राधान्य

ही बाब त्यावेळी जाहीर करण्यात आली नव्हती, परंतु नंतर समोर आलेल्या माहितीवरून असे स्पष्ट होते की, हे शिष्टमंडळ उच्च सतर्कतेखाली काम करत होते आणि मुत्सद्देगिरीसोबतच आपल्या सुरक्षेला प्राधान्य देत होते.

दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने या आठवड्यात चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. रॉयटर्सला सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून शुक्रवार ते रविवारच्या दरम्यान ही चर्चेची दुसरी फेरी होणार असून यातून तरी काही तोडगा लागतोय का याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.