Iran clarifies that no delegation has traveled to Islamabad : इराण आणि अमेरिकेतील दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची समाप्ती उद्या होणार आहे. त्यानिमित्ताने या दोन्ही देशाचे शिष्टमंडळ पाकिस्तानात शांतता चर्चेसाठी येणार होते. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी वान्स पाकिस्तानात दाखल होतील. मात्र, इराणकडून कोणतंही शिष्टमंडळ पाकिस्तानात पाठवले नसल्याचे आता समोर आलं आहे. यासंदर्भात इराणच्या सरकारी माध्यमांनी माहिती दिली.

होर्मुझवरील नियंत्रण सोडणे आणि अणू करारावर स्वाक्षरी करण्यासारखे अनेक करार इराणला मान्य नसल्याने त्यांनी आधीपासूनच या चर्चेला येणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, सोमवारी इराणचं शिष्टमंडळ चर्चेला येईल, असं अधिकृतरित्या सांगण्यात आलं. परंतु, आता शांतता चर्चेच्या पूर्वसंध्येलाच इराणी माध्यमांनी चर्चेला कोणीही गेलं नसल्याचं सांगितलं.

इराणच्या माध्यमांनी नेमकं काय सांगितलं?

पाकिस्तानातील नियोजित चर्चेकरता इराणचे शिष्टमंडळ गेल्याचे वृत्त फेटाळून लावताना’आयआरआयबी’ने (IRIB) म्हटले आहे की, इराणचे कोणतेही प्राथमिक किंवा दुय्यम शिष्टमंडळ इस्लामाबादला गेलेले नाही. तसेच इराणी अधिकाऱ्यांच्या दौऱ्याबाबतचे अहवाल आणि भेटीच्या वेळेबाबतचे दावे चुकीचे आहेत.

गेल्या आठवड्यात अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदीला सुरुवात केली. नाकेबंदीमुळे होर्मुझ सामुद्रधुनीत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या जहाजांना रोखले जात आहे. अमेरिकेने नाकेबंदी भेदून जाणाऱ्या इराणी जहाजावर हल्ला केला यानंतर इराणने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शिवाय चर्चेत सहभागी न होण्याचा मानसही बोलून दाखवला. दरम्यान, अमेरिका – इराण चर्चेबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. इराणने अण्वस्त्र निर्मिती करु नये या मागणीवर अमेरिका ठाम आहे. दुसरीकडे इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीवर पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी धडपड करत आहे. पण, यावेळी इराणने करार करण्यास नकार दिल्यास जबरदस्त परिणाम भोगावे लागतील असा इशार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे बुधवारी अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा होणार की नाही? की पुन्हा युद्ध पेटणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.