Iran denies Trump’s claims about the imminent execution of women protesters : इराणमध्ये आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या महिलांना फाशीची शिक्षा होणार असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. जानेवारी महिन्यात या महिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, हा दावा आता इराणच्या न्यायपालिकेने फेटाळून लावला आहे. महिलांना फाशीची शिक्षा होणार असल्याच्या बातम्या चुकीच्या असून फेक न्यूजद्वारे दिशाभूल करण्यात येत असल्याचं न्यायपालिकेने म्हटलं आहे.

न्यायपालिकेची अधिकृत वेबसाइट ‘मिझान ऑनलाइन’नुसार, अनेक महिलांना फाशीचा धोका असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. ट्रम्प यांची पुन्हा एकदा ‘फेक न्यूज’द्वारे दिशाभूल करण्यात आली आहे. अहवालात नमूद केलेल्या काही महिलांची आधीच सुटका करण्यात आली आहे, तर काहींवर अशा प्रकारचे आरोप आहेत ज्यामध्ये “दोषी ठरल्यास जास्तीत जास्त तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते”, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला या महिलांची सुटका करण्याचे आवाहन केले होते आणि असे केल्याने सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये मदत होऊ शकते, असे म्हटले होते. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले होते की, “या महिलांची सुटका केल्यास मला आनंद होईल.” त्यांनी एका पोस्टचा संदर्भ दिला होता ज्यामध्ये आठ महिलांना फाशीची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या पोस्टमध्ये छायाचित्रे होती, परंतु त्यांची ओळख पटवण्यात आली नव्हती.

मानवाधिकार संघटनांनी म्हटले आहे की, या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या किमान एका महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर दुसरीवर असे आरोप आहेत ज्यामध्ये फाशीची शिक्षा होऊ शकते. जानेवारीत सुरू झालेली ही आंदोलने दडपण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईत हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.

अमेरिकेतील कार्यकर्त्या मसिह अलिनेजाद यांनी ‘X’ वर ताब्यात घेतलेल्या आठ महिलांची नावे प्रसिद्ध केली आहेत. त्यांनी “त्यांची नावे सांगा” असे लिहित, ताब्यात घेतलेल्यांपैकी एक मुलगी केवळ १६ वर्षांची असल्याचा आरोप केला आहे.