एपी, कैरो – इराणच्या लष्कराने शुक्रवारी हिंद महासागरातील दिएगो गार्सिया येथील ब्रिटन आणि अमेरिकेच्या हवाई तळावर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. दिएगो गार्सिया चगोस बेटाचा भाग असून हे बेट इराणपासून सुमारे चार हजार किलोमीटर अंतरावर आहे. या हल्ल्यांमुळे इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेत वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आतापर्यंत इराणने आपल्याकडे २,००० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता असल्याची क्षेपणास्त्रे असल्याचे जाहीरपणे मान्य केले होते. मात्र, युद्ध सुरू होऊन तीन आठवडे पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी जाहीर क्षमतेपेक्षा दुप्पट अंतरापर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे डागली आहेत. ब्रिटनने या हल्ल्यांचे वर्णन ‘अविवेकी’ असे करून त्यांचा निषेध केला असला तरी इतर तपशील दिले नाहीत.

“इराण पश्चिम आशियात करत असलेल्या हल्ल्यांमुळे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक रोखून धरल्यामुळे ब्रिटन आणि मित्रदेशांच्या हितसंबंधांना धोका निर्माण झाला आहे,” अशी टीका ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने केली.

हवाई तळाचे महत्त्व

पश्चिम आशिया, दक्षिण आशिया आणि पूर्व आफ्रिकेतील सुरक्षाविषयक कारवायांसाठी दिएगो गार्सिया हवाई तळ अत्यावश्यक असल्याचे अमेरिकेकडून सांगितले जाते. यापूर्वी व्हिएतनाम, इराक, अफगाणिस्तान, तसेच येमेनमधील हुती बंडखोरांवर हल्ले करण्यासाठी अमेरिकेने दिएगो गार्सिया हवाई तळाचा वापर केला आहे. हुतींना लक्ष्य करण्यासाठी गेल्या वर्षी तेथे अनेक अण्वस्त्रवाहू ‘बी-२ स्पिरीट’ बॉम्बर विमाने तैनात करण्यात आली होती. तेथे अमेरिकेचे जवळपास २,५०० सैनिक आहेत. संशयित दहशतवाद्यांना गोपनीयरित्या इतरत्र हलवण्यासाठी या तळाचा वापर केला गेला होता, असे अमेरिकेने २००८मध्ये मान्य केले होते.