Iran Drone Attack Oman Oil Storage Video: अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळात आहे. यादरम्यान ओमानच्या सालालाह (Salalah) बंदरावरील तेल साठवण्याच्या टाक्यांना लक्ष्य करत ड्रोन हल्ले करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यानंतर लागलेल्या भीषण आगीचा व्हिडीओ समोर आला आहे. अल जजीरा आणि ओमान टीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिसे आङे. ब्रिटीश मॅरिटाइम सेक्युरिटी कंपनी अॅम्ब्रेने (Ambrey) केंद्रावर झालेल्या हल्ल्यांची पुष्टी केली आहे, मात्र व्यापारी जहाजांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांमधील ऊर्जा प्रकल्पांवर इराणकडून हल्ले केले जात आहेत, त्याचाच हा भाग असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून सुरू असलेल्या लष्करी कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून हे हल्ले केले जात आहेत.

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक अल-सैद यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संपर्क साधला आणि ओमानच्या भूभागावर होत असलेल्या या हल्ल्यांबद्दल त्यांनी आपली नापसंती आणि निषेध व्यक्त केला.

यावेळी ओमानच्या सुलतानांनी या युद्धात आपल्या तटस्थ भूमिकेचा यावेळी पुनरुच्चार केला, तसेच सुरक्षा आणि स्थैर्य राखण्यासाठी ओमान सर्व आवश्यक उपाययोजना करेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

द टाइम्स ऑफ इस्रायलने ९ मार्च रोजी अधिकृत ओमान न्यूज एजन्सीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांनी आयातुल्ला मोजतबा खामेनी यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले होते. त्यानंतर हा हल्ला करण्यात आला आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थी करण्याचे ओमानचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. या दोन्ही देशांमध्ये काही दिवसांपासून जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, अल जजीराने दिलेल्या वृत्तानुसार, युनायटेड किंगडम मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स सेंटरने (UKMTO) दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ तीन व्यापारी जहाजांवर हल्ला कपण्यात आला आहे.