Iran Economic Crisis: अमेरिका आणि इस्रायविरोधातील युद्ध सहाव्या महिन्यांनंतरही सुरु असल्याने इराणवर आर्थिक संकट ओढवलं आहे. इराणमधील नागरिकांना उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक संकट आणि महागाईमुळे नागरिक आता केस आणि अत्तराच्या रिकाम्या बाटल्यांची देखील विक्री करत आहेत. नागरिकांनी वस्तू खरेदी करण्याऐवजी रोजचे काम व अभ्यासासाठी लॅपटॉपसह इतर उपकरणं भाड्याने घेण्यावर भर दिला आहे.
दैनंदिन गरजा भागविण्यासाठी संघर्ष
इराणी वृत्तसंस्था आयएलएनएने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. आयएलएनएने इराणमधील या आर्थिक स्थितीला सर्व्हायव्हल इकॉनॉमी असे म्हटले आहे. इराणी नागरिकांना उत्पन्नाचे नवे मार्ग शोधावे लागत आहेत, तसेच घरातील विविध वस्तूंची विक्री देखील करावी लागत आहे. ऑनलाइन क्लासिफाइड वेबसाइट्सवर याबाबतच्या जाहिरातींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नागरिकांना महागाईचा प्रचंड फटका बसला असून, दैनंदिन गरजा भागविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
पैशांसाठी ऑनलाइनवर जुन्या वस्तू विक्रीवर भर
नागरिकांनी ऑनलाइनवर जुने कामाचे शूज आणि कपडे, रिकाम्या अत्तराच्या बाटल्या, हेअर एक्स्टेंशनसाठी वापरले जाणारे नैसर्गिक केस आणि आर्थिक हमी म्हणून मालमत्तेची कागदपत्रे आणि पगाराच्या स्लिप्स भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे. इराणचे अमेरिका आणि इस्रायविरोधातील युद्ध सहाव्या महिन्यानंतरही सुरु आहे. या संघर्षामुळे इराणला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आयएलएनएच्या वृत्तानुसार, लॅपटॉप भाड्याने घेण्याच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. टायपिंग, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वापर आणि ऑनलाइन क्लासेस यांसारख्या साध्या कामांसाठी नागरिक लॅपटॉप खरेदी करण्याऐवजी भाड्याने घेणे पसंत करत आहेत.
वार्षिक महागाई दर ६६ टक्क्यांवर
‘स्टॅटिस्टिकल सेंटर ऑफ इराण’च्या आकडेवारीनुसार, जुलै अखेर इराणचा वार्षिक महागाई दर ६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. आर्थिक अडचणींचा सामना करणारे नागरिक ऑनलाइन जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्नाचे मार्ग निर्माण करत आहेत. ऑनलाईन जाहिरातींमध्ये नैसर्गिक केसांच्या विक्रीच्या जाहिराती वाढल्या असून, केसांची लांबी, रंग आणि दर्जा यानुसार त्यांचे दर निश्चित केले जात आहेत.
