एपी, व्हिएन्ना

इराणच्या समृद्ध युरेनियमचा साठा ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेने लष्कर पाठवले तरी ते ताब्यात घेण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची, जोखमीची आणि दीर्घकाळ चालणारी असेल. त्यामध्ये किरणोत्सर्ग होण्याचा आणि रासायनिक संसर्गाचा धोके आहेत असे मत तज्ज्ञ आणि माजी सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध युद्ध पुकारण्याची कारणे आणि उद्दिष्टे यात सातत्याने बदल केला आहे. मात्र, इराणला अण्वस्त्रधारक देश होऊ द्यायचे नाही या त्यांच्या उद्देशात सातत्या असल्याचे दिसून आले आहे. इराणची आण्विक सामग्री ताब्यात घेण्यात किती रस आहे, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. युद्ध सुरू असताना समृद्ध युरेनियम ताब्यात घेण्यासाठी एक हजार प्रशिक्षित सैन्य पाठवण्यात मोठा धोका आहे. कोणत्याही बळाचा वापर न करता इराणबरोबर वाटाघाटी करून त्यांना हे युरेनियम देऊन टाकण्यावर सहमती घडवून आणणे हा दुसरा पर्याय अमेरिकेसमोर आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

इराणकडे ४४०.९ किलो समृद्ध युरेनियम आहे, त्याचे समृद्धीकरण ६० टक्क्यापर्यंत झाले आहे. एका लहानशा तांत्रिक कृतीने हे प्रमाण ९० टक्के होऊ शकते आणि ते थेट अण्वस्त्र निर्मितीसाठी वापरता येऊ शकते, असे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (आयएईए) म्हणणे आहे. इराणकडे असलेल्या समृद्ध युरेनियममधून १० अण्वस्त्रांची निर्मिती होऊ शकते, असे ‘आयएईए’चे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी गेल्या वर्षी ‘द असोसिएटेड प्रेस’ला सांगितले होते. मात्र, याचा अर्थ इराणकडे आता अण्वस्त्रे आहेत असा होत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले होते.