Iran envoy Mohammad Fathali clarifies no toll collection from Indian ships in Hormuz : अमेरिकेने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर लादलेल्या युद्धात इराणने होर्मुझची सामुद्रधुनीवर निर्बंध आणले होते. अशाही परिस्थितीत भारताच्या विनंतीनंतर भारताच्या अनेक तेलवाहू जहाज भारताच्या दिशेने रवाना कऱण्यात आले. मात्र, जहाजांना प्रवासाची मुभा देण्याकरता भारताला कर भरावा लागला होता, असं वृत्त सातत्याने समोर येत होतं. या वृत्ताचं इराणने आता खंडन केलं आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा कर लादलेला नाही, हवंतर तुमच्या सरकारला विचारा, असं भारतातील इराणचे दुतावास फथअली यांनी म्हटलंय. काल, त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं.

फथअली म्हणाले, “आमचे भारत सरकारशी चांगले संबंध आहेत. आम्हाला भारत सरकारला मदत करायची आहे आणि त्यांनीही या दिवसांत आमच्याशी असलेल्या संबंधांमुळे आम्हाला मदत केली आहे. आमचा ‘नौकानयन स्वातंत्र्यावर’ (freedom of navigation) विश्वास असून आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्यांशी बांधील आहोत. मात्र, होर्मुझची सामुद्रधुनी हे इराण आणि ओमानचे प्रादेशिक जलक्षेत्र आहे.”

टोल आकारलाच नाही

जेव्हा त्यांना विचारण्यात आले की भारतीय जहाजांना ही सामुद्रधुनी ओलांडण्यासाठी भारत सरकारला पैसे द्यावे लागतात का, तेव्हा ते म्हणाले, “भारताने पैसे दिले आहेत की नाही, हे तुम्ही भारत सरकारला विचारू शकता.” ते पुढे म्हणाले, “इराण आणि भारत या दोन्ही देशांचे हितसंबंध समान आहेत आणि भविष्यातही आमचे संबंध चांगले राहतील, असा आमच्या उच्चपदस्थांचा विश्वास आहे. सध्याच्या कठीण काळातही आमचे संबंध उत्तम आहेत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी दोनदा संवाद साधल्याची आठवण करून देत ते म्हणाले, “इराण आणि भारत यांचे समान हितसंबंध आणि समान भविष्य आहे.” होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा पूर्णपणे सुरू करण्यासाठी काय करावे लागेल, असे विचारले असता राजदूत फथअली म्हणाले की, इराण नौकानयन स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांशी बांधील आहे.

इराणच्या राजदूतांनी संकेत दिले की, वॉशिंग्टनने “बेकायदेशीर मागण्या” करणे थांबवल्यास इराण अमेरिकेसोबत चर्चेच्या आणखी एका फेरीसाठी तयार आहे. इस्लामाबादमधील चर्चा अनिर्णित राहिल्यानंतर त्यांनी हे विधान केले. इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी ही टिप्पणी केली. फथअली म्हणाले की, अमेरिकन बाजूने ठेवलेल्या अस्वीकार्य अटींमुळे ही बोलणी यशस्वी होऊ शकली नाहीत. “जर त्यांनी आमच्या अटी मान्य केल्या तर चर्चा शक्य आहे,” असे सांगत त्यांनी भविष्यातील चर्चेसाठी दरवाजे उघडे ठेवले.