Iran attacks Israel, Bahrain, UAE, Qatar: इराणने सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्याचा बदला म्हणून एकाच वेळी इस्रायल, बहरीन, युएई आणि कतारवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. वृत्तानुसार, युएईची राजधानी अबू धाबी येथे स्फोटांचे आवाज ऐकू आले, तर कतारच्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेने एक क्षेपणास्त्र हवेतच रोखले. अबू धाबी आणि कतारची राजधानी दोहा येथील अमेरिकन हवाई तळांवर प्रत्यक्ष हल्ला झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्या ठिकाणी सायरन वाजल्याची माहिती आहे.

अबू धाबीमध्ये युएई हवाई दल आणि अमेरिकन हवाई दलाचा अल धफ्रा हवाई तळ आहे. दोहामधील २४ हेक्टर परिसरात पसरलेला अल उदेद हवाई तळ हा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे मुख्यालय मानला जातो.

अमेरिकेच्या पाचव्या फ्लीटवर क्षेपणास्त्र हल्ला

‘न्यूज १८’ने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी बहरीनने बेटावरील अमेरिकन नौदलाच्या पाचव्या फ्लीटच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची माहिती दिली. या हल्ल्याबाबत तत्काळ सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. “पाचव्या फ्लीटच्या सेवा केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला असून, तपशील नंतर दिले जातील,” असे बहरीनच्या नॅशनल कम्युनिकेशन सेंटरने निवेदनात म्हटले आहे. अमेरिकन नौदलाच्या पाचव्या फ्लीटच्या कार्यक्षेत्रात आखात, लाल समुद्र, अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातील काही भागांचा समावेश होतो. अनेक अमेरिकन जहाजांचे गृहबंदर बहरीनमध्ये असून, त्यात खाणविरोधी जहाजे आणि लॉजिस्टिक सपोर्ट जहाजांचाही समावेश आहे.

इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणमध्ये हल्ले केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की, इराणमधील लष्करी कारवाया अमेरिकन नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात येत आहेत.

“त्यांच्या नौदलाचाही नाश करू”

“काही काळापूर्वी अमेरिकन सैन्याने इराणमध्ये मोठी लष्करी मोहीम सुरू केली आहे. इराणी राजवटीकडून येणारा धोका दूर करून अमेरिकन लोकांचे रक्षण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे ट्रम्प म्हणाले. “इराणकडे अण्वस्त्रे नसावीत, कधीच नाही. या राजवटीने अमेरिकन लष्करी सामर्थ्याला आव्हान देऊ नये, हे त्यांना समजेल. आम्ही त्यांची क्षेपणास्त्रे आणि क्षेपणास्त्र उद्योग उद्ध्वस्त करू, तसेच त्यांच्या नौदलाचाही नाश करू,” असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, सौदी अरेबियामध्ये अमेरिकेचे २,००० हून अधिक सैनिक तैनात असल्याची माहिती आहे. त्यापैकी काही सैनिक रियाधपासून सुमारे ६० किमी दक्षिणेला असलेल्या प्रिन्स सुलतान एअर बेसवर कार्यरत आहेत. या तळावर अमेरिकन लष्कराच्या मालमत्तेला आधार देण्यात येतो, ज्यात पॅट्रियट क्षेपणास्त्र बॅटरी आणि टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स (THAAD) प्रणालीचा समावेश आहे. अबू धाबी, दोहा आणि रियाध येथील अमेरिकन सैन्यावर प्रत्यक्ष हल्ला झाला की नाही, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता आलेली नाही.