US and Israel launch attack on Iran: इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाने रविवारी नवे वळण घेतले असून दोन्ही देशांनी एकमेकांवर थेट क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. यामुळे प्रादेशिक संघर्ष तीव्र झाला आहे. इस्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार, तेहरानवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये उत्तर इस्रायलमधील महत्त्वाचे बंदर शहर हैफा लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
इस्रायलने इराणमधील लष्करी ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर काही तासांतच इस्रायलच्या विविध भागांत हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले. त्यानंतर इराणी क्षेपणास्त्रांचा मारा सुरू झाल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. काही क्षेपणास्त्रे हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे अडवण्यात आल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
दरम्यान, या संघर्षात आता अमेरिकेचीही थेट एन्ट्री झाली आहे. अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ला दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणी लक्ष्यांवर हवाई आणि समुद्री हल्ले सुरू केले आहेत. या कारवाईची संपूर्ण व्याप्ती तातडीने स्पष्ट झाली नसली तरी ही मोहीम अनेक दिवस चालू राहू शकते, असे संकेत देण्यात आले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या संदेशात या कारवाईचे वर्णन “मोठ्या प्रमाणात आणि सुरू असलेली” असे केले. त्यांनी तेहरानला अण्वस्त्र मिळविण्यापासून रोखण्याची शपथ घेत इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमामुळे अमेरिकेसह मित्र राष्ट्रांना थेट धोका असल्याचा आरोप केला. “इराणी राजवटीकडून येणाऱ्या धोक्यांना दूर करून अमेरिकन लोकांचे रक्षण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
या घडामोडींमुळे मध्य पूर्वेत मोठ्या युद्धाची भीती निर्माण झाली असून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष या संघर्षाकडे लागले आहे.
