Iran Vs Israel War : मागील काही दिवसांपासून अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध अद्यापही थांबलेलं नाही. या युद्धात आतापर्यंत इराणचं मोठं नुकसान झालं असून इराणच्या काही नेत्यांसह लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा या युद्धात मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा इराणसाठी एक मोठा धक्का आहे. पण तरीही हे युद्ध पूर्णपणे थांबलेलं नाही.

सध्या हे युद्ध थांबवण्यासाठी पावलं उचलले जात आहेत. पण अमेरिकेने दिलेला प्रस्ताव इराणला मान्य नसल्याने यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. इराणने अमेरिकेचा शांतता प्रस्ताव फेटाळून लावत स्वत:च्या काही अटी अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत. या घडामोडी सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

इराणने इस्रायलवर ८३ व्या वेळी क्षेपणास्त्र डागली आहेत. मात्र, यावेळी इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागताना लिहिलेल्या एका संदेशाची मोठी चर्चा होत आहे. इराणने इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रावर ‘Thank You People Of India’ असा संदेश लिहिला आणि त्यानंतर इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. इराणने या माध्यमातून नेमकं काय संदेश देण्याचा प्रयत्न केला? याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, पश्चिम आशियात सुरू असलेल्या या तणावादरम्यान भारताच्या लोकांनी इराणबाबत दाखवलेल्या पाठिंब्याबाबत कृतज्ञता म्हणून इराणने हा संदेश दिल्याचं बोललं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर युजर्सकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.