अमेरिकेने इराणबाबत अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. दोन्ही देशांमधील तणाव हा पूर्वीपासून असाच होता का? गेल्या काही वर्षांमध्ये नेमकं काय बदलले आहे? याबद्दल इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्टीकरण दिले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील अनेक दशकांच्या शत्रुत्वाचे मूळ हे १९७९ च्या इस्लामिक क्रांतीमध्ये असल्याचे अराघची म्हणाले. तसेच इस्रायली लॉबींकडून सातत्याने भरवण्यात आलेल्या अविश्वासामुळे हे शत्रुत्व टिकून असल्याचेही ते म्हणाले. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

इराणच्या परराष्ट्र मंत्री म्हणाले की, इराणला वाटते की, अमेरिकेचे धोरण हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातही इराणी समाजाशी थेट संवादाऐवजी, गैरसमज आणि बाह्य प्रभावांतून तयार झाले आहे.

अब्बास अराघची यांनी पुढे या गोष्टीवर भर दिला की, आजच्या शत्रुत्वाचे मूळ हे १९७९ च्या इस्लामिक क्रांतीमध्ये आहे. या क्रांतीमध्ये अमेरिकेचा पाठिंबा असलेले शाहांची राजवट उलथवून टाकण्यात आली आणि पाश्चिमात्य देशांशी एकनिष्ठ असलेली राजेशाही घालवून त्या ऐवजी इस्लामिक रिपब्लिकची स्थापन करण्यात आली, यामुळे अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांबरोबर इराणच्या संबंधांमध्ये मूलभूत पातळीवर बदल घडला.

“या सगळ्याची सुरूवात इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनपासून झाली,” असे ते म्हणाले. “मला वाटते की, हे का घडले हे समजून घेण्यात अमेरिकन लोक अपयशी ठरले. त्यामुळे त्याच्याविरोधात त्यांनी शत्रुत्व सुरू केले,” असे ते म्हणाले. तसेच तेव्हापासून इराणला सतत दबावाचा सामना करावा लागल्याचे अराघची म्हणाले.

“म्हणूनच गेल्या ४७ वर्षांपासून, आम्ही त्यांच्या आमच्याविरोधातील शत्रुत्वाचे लक्ष्य किंवा बळी ठरलो आहोत,” असे अराघची म्हणाले. “त्यांनी सर्व प्रयत्न करून पाहिले. त्यांनी अनेकदा सत्तापालटाचे प्रयत्न केले. त्यांनी सद्दाम हुसेन यांना आमच्यावर आठ वर्षांचे युद्ध थोपण्यासाठी मदत केली. गेल्या वर्षी, आणखी एक युद्ध. वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध. प्रचंड दबाव. आणि ते अपयशी ठरले.”

इराणचा इस्रायली लॉबींवर आरोप

इराणचे मंत्री म्हणाले की थेट समजून घेण्याऐवजी अमेरिकेचा इराणबाबतचा दृष्टीकोन हा बाह्य नरेटिव्हनी तयार झालेला आहे. “कारण त्यांच्याकडे इराणबद्दल आणि इराणी लोकांबद्दल खरी माहिती नाही, आणि त्यांना प्रामुख्याने इस्रायली लॉबींकडून अपप्रचार मोहिमांद्वारे चुकीची माहिती पुरवली जाते,” असे अराघची म्हणाले.

तीव्र टीका केल्यानतही अराघची म्हणाले की, जर अमेरिकेने आपले धोरण बदलले तर इराण त्यांच्याबरोबरच्या संबंधांबाबत वेगळ्या मार्गाचा अवलंब करण्यास तयार आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यात, अणू कराराच्या अप्रत्यक्ष वाटाघाटींच्या तिसऱ्या फेरीची तयारी केली जात आहे. ओमानच्या मध्यस्थीने जिनेव्हा येथे या वाटाघाटी होणार आहेत. पार्श्वभूमीवक इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी तणाव वाढलेला असतानाच ही चर्चा होत आहे. यादरम्यान अराघची म्हणाले की, जर वॉशिंग्टनने आदरपूर्ण दृष्टीकोन स्वीकारला, तर संबंध सुधारू शकतात.

“मला वाटते की एकमेव उपाय म्हणजे इराणी लोकांशी आदराच्या भाषेत बोलणे,” असे अराघची म्हणाले. “जर त्यांनी ती भाषा वापरली, तर त्यांना परिणाम दिसून येईल. तसेच आम्ही देखील त्यांच्याशी त्याच भाषेत बोलू,” असेही इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणाले. “जर त्यांना दबाव, बळाची भाषा वापरायची असेल तर त्याचा परिणाम आपण पाहतोच आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.