US Iran War: “अमेरिका आणि इराण शांतता चर्चेत पाकिस्तान मध्यस्थी म्हणून उत्तम भूमिका बजावत आहे. पण, या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी भारत किंवा चीनकडून सहकार्य मिळाल्यास आम्ही त्याचे स्वागत करु”, असे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची म्हणाले. अराघची यांनी भारतातील ब्रिक्स परराष्ट्र व्यवहार बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीनंतर दिल्लीत आयोजित परिषदेत अराघची यांनी सविस्तर भूमिका मांडली. “इराणचा अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही तसेच, लष्करी बळाचा वापर करुन संघर्षावर तोडगा निघणार नाही”, असेही अराघची यावेळी म्हणाले.

इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची काय म्हणाले?

“सध्या सुरु असलेल्या संघर्षावर लष्करी बळाचा वापर करुन तोडगा काढता येणार नाही”, अशी भूमिका इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. “इराण अमेरिकेवर विश्वास ठेऊ शकत नाही पण, अमेरिकेला इराणवर विश्वास ठेवण्यासारखी अनेक कारणं आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थिती नाजूक असली तरी आम्ही चर्चेतून मार्ग काढण्यासाठी तयार आहोत. जहाजांना सुखरुप बाहेर पडण्यासाठी मदत पुरविण्यासाठी तयार आहोत”, असेही अराघची यांनी स्पष्ट केले.

IRGC ची आक्रमक भूमिका

दुसरीकडे”डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर इराणच्या अटी मान्य करण्यावाचून पर्याय उरलेला नाही असे वक्तव्य इराणच्या आयआरजीसीने केले आहे”. तसेच, अमेरिकेकडून ठोस आणि विश्वासहार्य माहिती मिळत नाही तोपर्यंत शांतता चर्चा सुरु होणार नाही, अशी भूमिका आयआरजीसीने घेतली आहे.

ट्रम्प यांचा चीन दौरा

चीनच्या दौऱ्यावर असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिगपिंग यांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबत सकारत्मकता दर्शवली असल्याचे सांगितले. जागतिक उर्जा पुरवठा आणि वाहतुकीसाठी होर्मुझ खुली राहणे महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केल्याचे ट्रम्प म्हणाले. दरम्यान, इराणी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतून काही चिनी जहाजं सुखरुप बाहेर पडली आहेत.

इराणकडे अण्वस्त्र असू नये यावर एकमत

चीन इराणला लष्करी मदत पुरवणार नसल्याचे आश्वासन देखील शी यांनी दिल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच, इराणकडे कधीच अण्वस्त्र असू नये यासाठी शी आणि ट्रम्प यांच्यात एकमत झाल्याचे व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ट्रम्प आणि शी यांच्यात झालेल्या बैठत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. अमेरिकी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी वाव देण्याचा प्रस्ताव देखील यांनी यावेळी मांडला. ट्रम्प यांच्याबरोबर अमेरिकेतील बडे उद्योजक देखील चीनमध्ये दाखल झाले आहेत.

रशियाने स्पष्ट केली भूमिका

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गल्फमध्ये सुरु असलेल्या वादावर भाष्य केले. “होर्मुझ सामुद्रधुनी इराणने बंद केलेली नाही तर, अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले झाल्यानंतर ती त्यांना बंद करावी लागली”, असे लावरोव्ह म्हणाले. भारतात ब्रिक्स परराष्ट्र व्यवहार बैठकीनंतर लावरोव्ह यांनी होर्मुझबाबत मत मांडले. “प्रत्येक संघर्षाच्या मागे असणारे मूळ कारण समजून घ्यायला हवं. इथं अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले केले जात आहेत, त्यामुळे गल्फमध्ये तणाव निर्माण झाला आहे”, असे लावरोव्ह म्हणाले.