Iran Foreign Minister Pakistan Visit US Iran Peace Talks negotiation updates : इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी आपण पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा रखडलेली असताना अराघची हे पाकिस्तानबरोबरच ओमान आणि रशिया या देशांचा देखील दौरा करणार आहेत.

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी ठप्प झालेल्या असताना अराघची यांचा हा दौरा होत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम आहे. यादरम्यान इराण अमेरिकेबरोबरच्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होणार की नाही याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.

पाकिस्तानकडून अमेरिका-इराण यांच्यातील संभाव्य चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी तयारी केली जात आहे. मात्र, अद्यापही मध्यपूर्वेतील युद्धावर चर्चा करण्यासाठी अराघची किंवा त्यांचे शिष्टमंडळ अमेरिकन अधिकाऱ्यांना भेटणार की नाही याबद्दल स्पष्टता मिळालेली नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये अराघची म्हणाले की, “इस्लामाबाद, मस्कत आणि मॉस्कोच्या नियोजित दौऱ्यावर निघत आहे. माझ्या या भेटींचा उद्देश द्विपक्षीय मुद्द्यांवर आमच्या भागीदारांशी जवळून समन्वय साधणे आणि प्रादेशिक घडामोडींवर चर्चा करणे हा आहे. आमच्या शेजारी देशांना आम्ही प्राधान्य देतो.”

इराणच्या सरकारी माध्यमांनी या नियोजित दौऱ्याची माहिती दिल्यानंतर काही वेळातच अराघची यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इराणची अधिकृत वृत्तसंस्था IRNA ने दिलेल्या वृत्तानुसार, अराघची शुक्रवारी संध्याकाळपासून आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील आणि सर्वप्रथम इस्लामाबाद, त्यानंतर मस्कत आणि मॉस्कोला भेट देतील.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान हा मध्यस्थी करत आहे. या महिन्याच्या सुरूवातीला अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेची पहिली फेरी पार पडली होती, पण या चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघू शकला नव्हता. त्यानंतर इराणने अद्यापही दुसऱ्या फेरीत सहभागी होण्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही.

दुसरीकडे शुक्रवारी इस्लामाबादमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. तसेच संपूर्ण शहरात जागोजागी तपासणी नाके उभारण्यात आल्याचे पाहायला मिळाले. याबरोबरच जिथे ही संभाव्य चर्चा होण्याची शक्यता आहे त्या हाय-सिक्युरिटी ‘रेड झोन’मधील रस्ते बंद करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही वरिष्ठ अमेरिकन अधिकारी पाकिस्तानचा दौरा करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.