Iran India Gas Tankers update on Strait of Hormuz shipping route : इराणने दोन भारतीय ध्वजधारक लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) वाहून आणणाऱ्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय आणणाऱ्या इराणच्या नाकेबंदीमधील हा एक दुर्मिळ अपवाद आहे, सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने यासंदर्भताली वृत्त दिलं आहे. ‘शिवालिक’ या भारतीय ध्वजधारक एलपीजी टँकरने भारतीय नौदलाच्या संरक्षणाखाली ही सामुद्रधुनी ओलांडली असून, ‘नंदा देवी’ हे दुसरे जहाज पुढील काही तासांत तिथून बाहेर पडण्याची अपेक्षा आहे.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला सुरू केल्यापासून तेहरानने या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर रोखली आहे. ही सामुद्रधुनी इराणच्या किनारपट्टीवरून जाते आणि सामान्यतः जगातील सुमारे २०% तेल आणि सागरी मार्गाने होणाऱ्या नैसर्गिक वायूचा पुरवठा येथूनच होतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती चर्चा
अमेरिका किंवा त्याच्या मित्रराष्ट्रांसाठी कोणताही पुरवठा या सामुद्रधुनीतून जाऊ दिला जाणार नाही, असे इराणने म्हटले आहे; मात्र भारताने यासाठी सवलत मागितली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा केली असून आखाती देशांतून वस्तू आणि उर्जेच्या वाहतुकीबाबत चर्चा केली आहे.
युद्ध सुरू झाल्यानंतर बंदरात आलेल्या एका जहाजावरील १८३ इराणी खलाशांना भारताने सुरक्षित आश्रयही दिला आहे. हे जहाज भारतात सरावासाठी सहभागी झालेल्या तीन जहाजांपैकी एक होते; त्यापैकी अन्य एक जहाज श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ अमेरिकन टॉर्पेडोने बुडवले होते.
देशात भीषण गॅस टंचाई
भारतातील घरगुती वापराच्या गॅसचा तुटवडा टाळण्यासाठी सरकारने उद्योगांचा पुरवठा कमी केला असून, देशात सर्वात भीषण गॅस संकट निर्माण झालं आहे. ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ ही जहाजे सरकारी मालकीच्या ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (SCI.NS) च्या मालकीची आहेत. मरीन ट्रॅफिकच्या ट्रॅकिंग डेटा’नुसार, २५ फेब्रुवारी रोजी कतारच्या समुद्रात पोहोचलेले शिवालिक जहाज १२ मार्च रोजी संयुक्त अरब अमिरातीपासून २४ मैलांपर्यंतच्या विशेष आर्थिक क्षेत्रात होते.
मरीन ट्रॅफिकच्या माहितीनुसार, नंदा देवी जहाज शुक्रवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या प्रवेशद्वाराजवळ इराणी समुद्रात शेवटचे दिसले होते. हे जहाज युएईच्या समुद्रात जाण्यापूर्वी २७ फेब्रुवारी रोजी कतारच्या रास लफान (Ras Laffan) बंदरावर थांबले होते, असं डेटावरून स्पष्ट होतंय. याव्यतिरिक्त, दोन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि लॉयड्स लिस्ट इंटेलिजन्सच्या आकडेवारीनुसार, १ मार्चच्या सुमारास सामुद्रधुनीतून प्रवास करून सौदी अरेबियाचे तेल घेऊन जाणारे एक कच्चे तेल वाहक जहाज शनिवारी भारतात पोहोचण्याची शक्यता आहे.
