Iran Hoot Torpedo vs US Navy War Intent: अमेरिका-इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणविरोधात युद्धमोहीम सुरू केली होती. त्याला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. या युद्धात इराणसह पश्चिम आशियासह संपूर्ण जग होरपळून निघाले. भारतात अजूनही एलपीजी संकट कायम आहे. गेल्या काही आठवड्यांपासून युद्धबंदी असली तरी अमेरिका आणि इराण युद्धाची तयारी करत असल्याच्या बातम्या अधूनमधून येतात. आता इराणच्या नौदल प्रमुखांनी त्यांच्याकडे एक गुप्त शस्त्र असल्याचे म्हटले आहे. हे शस्त्र अमेरिकेन नौदलाला धडकी भरवेल, असाही दावा त्यांनी केला आहे.

पाण्याखालून गोळीच्या वेगाने प्रवास करत शत्रूच्या पाणबुड्या आणि युद्धनौकांचा वेध घेणाऱ्या इराणच्या या शस्त्राचे नाव हूट टोरपॅडो असल्याचे सांगितले जाते. गुरूवारी इराणच्या नौदल प्रमुखांनी या शस्त्राची वाच्यता केली. तसेच यामुळे शत्रू खूप घाबरला असल्याचे सांगितले. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी, अशी मागणी ट्रम्प यांनी केली असून त्यासाठी समुद्रात इराणचे नाकेबंदी केली आहे. ही नाकेबंदी उठविण्यासाठी त्यांनी नकार दिल्यामुळे पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.

इराण नौदल कमांडर शहराम इराणी यांनी या नव्या शस्त्राबद्दलचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, इराणी नौदलाला आम्ही जलसमाधी दिली. मात्र इराणी नौदलाने हा दावा चुकीचा असल्याचे आपल्या विधानातून स्पष्ट केले आहे. “आम्ही एका नवीन शस्त्राने शत्रूवर हल्ला करू. हे शस्त्र लक्ष्याच्या अगदी जवळ आहे. मला आशा आहे की, यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ नये”, असे वक्तव्य करून इराणने पुन्हा एकदा आव्हान उभे केले आहे.

‘हूट टॉर्पेडो’ची चर्चा

इराणचा इशारा कदाचित ‘हूट टॉर्पेडो’कडे असावा, अशी अटकळ संरक्षण विषयातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. याची पहिली चाचणी २००६ च्या सुमारास गुप्तपणे घेण्यात आली होती. या टॉर्पेडोचा वेग इतका प्रचंड आहे की, शत्रूच्या संरक्षण यंत्रणांना प्रतिक्रिया देण्यासाठी क्वचितच वेळ मिळतो. दरम्यान हूट टॉर्पेडोबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. इराणने याबाबत गुप्तता पाळली आहे.

Dark Eagle Hypersonic Missile, US Iran war 2026
इराणवर सर्वात मोठा हल्ला करण्याची ट्रम्प यांची तयारी? अमेरिकेचे ‘डार्क ईगल’ क्षेपणास्त्र नेमकं किती घातक?

हूट टॉर्पेडो म्हणजे काय?

‘हूट’ या शब्दाचा पर्शियन भाषेतील अर्थ होतो देवमासा (व्हेल). इराणने केलेल्या दाव्यानुसार, हे जगातील पाण्याखालील सर्वात वेगवान शस्त्रांपैकी एक आहे. रशियानंतर सुपर कॅविटेटिंग टॉर्पेडो बाळगणारा इराण हा दुसरा देश आहे. सुपर टॉर्पेडो हे इतर पारंपरिक टॉर्पेडोपेक्षा वेगळे कसे ठरतात? इतर टॉर्पेडोची पाण्याखालून मारा करण्याची क्षमता ताशी ६० ते १०० किमीपर्यंत असते. तर इराणच्या हूट टॉर्पेडोचा वेग ताशी ३६० किमी असल्याचे म्हटले जाते.

१९७० च्या दशकात रशियन शास्त्रज्ञांनी घन-इंधनावर चालणारे रॉकेट मोटर विकसित केले होते. हे टॉर्पेडो भोवती वायूचे कवच निर्माण करते. ज्यामुळे पाण्याचा अडथळा मोठ्या प्रमाणात कमी होतो. ज्यामुळे टॉर्पेडोला अतिवेगाने मारा करता येणे शक्य होते. यालाच सुपर कॅव्हिटेशन तंत्रज्ञान म्हणतात.

हूट टॉर्पेडोची कमतरता काय?

हूट टॉर्पेडोचे आणखी एक वेगळेपण म्हणजे ते २०० किलोपेक्षा जास्त वजनाचे उच्च-स्फोटक वॉरहेड वाहून नेऊ शकते. अतिवेगाने मारा करण्याची क्षमता असली तरी हीच हूट टॉर्पेडोची कमतरताही आहे. कारण उच्च वेग असल्यामुळे इंधन अत्यंत वेगाने जाळले जाते. यामुळे इराणी हूट टॉर्पेडोचा पल्ला केवळ १५ किमी अंतरापर्यंत आहे. इतर पारंपरिक टॉर्पेडोची क्षमता ३० किमीपर्यंत मारा करण्याइतकी असते.

america iran war powers resolution deadline
अमेरिका-इराण युद्धाचा ६० दिवसांचा अल्टिमेटम आज संपणार; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प काय पाऊल उचलणार?

हूट टॉर्पेडोमुळे अमेरिकन जहाजांना धोका?

संरक्षण तज्ज्ञ संदीप उन्नीथन यांनी इंडिया टुडेला माहिती देताना सांगितले की, हूट टॉर्पेडोची नजीकच्या काळात वास्तविक चाचणी झालेली नाही. अशा सुपर टॉर्पेडोची वेग आणि आवाज ही मुख्य समस्या आहे. त्यामुळे त्यांचा अचूक मारा करण्यात अडचणी येतात. इराणजवळ तैनात असलेल्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकनसारख्या महाकाय विमानवाहू जहाजाला खिंडार पाडणे सोपे नाही. या जहाजाला मजबूत चिलखत असून दुहेरी आणि तिहेरी कवच आहे.

अब्राहम लिंकनसारखी विमानवाहू जहाजे हे अनेक टॉर्पेडोची हल्ले सहन करण्यासाठी बनवलेली असतात. तसेच अशा विमानवाहू जहाजांना इतर विनाशिका, क्रूझर, पाणबुड्या आणि जेट विमानांचा वेढा असतो. यालाच कॅरियर स्ट्राइक ग्रुप (CSG) असे म्हणतात. एकत्रितपणे त्यांनी शेकडो मैलांचे क्षेत्र व्यापलेले असते.

इराणच्या हूट टॉर्पेडो अमेरिकेच्या महाकाय जहाजावर डागायचे असेल तर त्यांना हे संरक्षक कवच भेदावे लागेल. हूटची मारक क्षमता १५ किमी इतकी असल्यामुळे त्यांना हे संरक्षक कवच भेदणे अशक्य आहे. हूटचा मारा करायचा असेल तर इराणच्या पाणबुड्या किंवा जहाजांना सुरक्षा कवचाच्या जवळ जावे लागेल. मात्र सामरिकदृष्ट्या हे आत्मघातकी ठरेल.

अमेरिकेचे ‘डार्क ईगल’ क्षेपणास्त्रही तयार

अमेरिकन सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) पश्चिम आशियात ‘डार्क ईगल’ ही हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे समुद्रात इराणी नौदल तयारी करत असताना अमेरिकाही आपले शस्त्र सज्ज करत असल्याचे दिसत आहे. सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजच्या अहवालानुसार, अमेरिकेकडे असलेल्या प्रिसिजन स्ट्राईक मिसाईल्सचा साठा वेगाने कमी होत असल्याने आणि लाँचर्स इराणच्या टप्प्याबाहेर हलवावे लागल्याने ही मागणी करण्यात आली आहे.

‘डार्क ईगल’ हे अमेरिकन लष्कराच्या ताफ्यातील लांब पल्ल्याचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. त्याची मारक क्षमता सुमारे २,७७६ किमी (१,७२५ मैल) पेक्षा जास्त असून ते आवाजाच्या वेगापेक्षा पाचपट अधिक वेगाने प्रवास करू शकते.