Iran Strait of Hormuz Toll Tax Law and Oil Price Hike: अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने आता जागतिक व्यापार मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत एक अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. या सागरी मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाकडून आता ‘टोल’ वसूल करण्याचा नवीन कायदा इराणच्या संसदेत आणला जात आहे. यामुळे या सागरी मार्गावरून होणार्‍या जहाजांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

इराणचे संसदेत एक विधेयकाचा आराखडा तयार केला जात आहे, ज्याअंतर्गत या अरुंद सागरी मार्गातून जाणाऱ्या जहाजांवर शुल्क आकारले जाईल. हे शुल्क जहाजांची सुरक्षा आणि देखरेख ठेवण्यासाठी आकारले जाईल, असे वृत्त सेमी-ऑफिशियल Fars न्यूज एजंसीच्या हवाल्याने ब्लूमबर्गने दिले आहे.

इराणचा प्रस्ताव काय आहे?

या कल्पनेवर अद्याप काम सुरू आहे, पण ती लवकरच अधिक स्पष्ट स्वरुपात प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्टनुसार पुढील आठवड्यापर्यंत याचा आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाऊ शकते.

“आम्ही होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे सार्वभौमत्व, नियंत्रण आणि देखरेख याला कायद्याने औपचारिक मान्यता मिळेल अशा प्रस्तावावर विचार करत आहोत, आणि टोलच्या वसूलीतून देशासाठी एक महसुलाचा स्त्रोतही तयार होईल,” असे वृत्त Fars ने एका खासदारांच्या हवाल्याने दिले आहे.

इराणच्या या निर्णयाची वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे. मध्य पूर्वेतील संघर्षाचा सध्या चौथा आठवडा सुरू असून या काळात जगातील पाचवा हिस्सा तेलाचा पुरवठा ज्या मार्गाने होतो त्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत अनेकदा अडथळे पाहायला मिळाले आहेत.

या काळात चीन आणि इराणशी संबंधित जहाजे सोडली तर इतर जहाजांना येथून प्रवास करता आलेला नाही. या मार्गावरून त्याच्या क्षमतेपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात वाहतूक होते आहे. या अडथळ्याचा परिणाम संपूर्ण जगातील ऊर्जा बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.

तेलाचा पुरवठा आणि किमतीवर परिणाम

जहाजांच्या वाहतूकीवर निर्बंध आल्याने पर्शियन आखातातील तेलाचे उत्पादन कमी करावे लागले. प्रदेशातील रिफायनरींना देखील फटका बसला ज्यामुळे पुरवठ्यावर अधिकच प्रभाव पडला. यामुळे तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या. या आठवड्यात ग्लोबल बेंचमार्क ब्रेंट क्रूडचे दर ११४ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले. दरम्यान इराणकडून टोल आकारण्याच्या या प्रस्तावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीबाबत अनिश्चितता अजून वाढली आहे.