Iran Hormuz Strait Warning triggers tensions across Global Shipping : इराणने महत्त्वपूर्ण अशा होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपल्या सार्वभौमत्वाचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे. इराणने व्यापारी आणि नौदलाच्या दोन्ही जहाजांना कडक इशारा दिला असून, त्यांनी जहाजांच्या वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा त्यांना संभाव्य परिणामांना सामोरे जावे लागेल असे म्हटले आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
निश्चित केलेल्या मार्गावरूनच प्रवास करणे
इराणी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या एका विधानानुसार, ‘खातम अल-अंबिया सेंट्रल हेडक्वार्टर’ने घोषित केले की, “होर्मुझच्या सामुद्रधुनीचे व्यवस्थापन इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सशस्त्र दलांद्वारे पूर्ण अधिकाराने केले जाते.” पुढे म्हटले आहे की, “सर्व जहाजे, व्यावसायिक जहाजे आणि टँकर्सनी केवळ निश्चित केलेल्या मार्गांवरूनच प्रवास करणे आणि ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स नेव्ही’ची (IRGC) परवानगी मिळवणे आवश्यक आहे. या नियमांचे कोणतेही उल्लंघन केल्यास त्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होईल.”
होर्मुझमधून मिळणारा कर कोण घेणार?
होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एक नवीन नियम लागू करण्यासाठी, तेथून जाणाऱ्या जहाजांवर कर आकारण्यासाठी आणि त्यातून मिळणारा महसूल आपापसात वाटून घेण्यासाठी इराण आणि ओमान दरम्यान सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल समोर आले आहे. तसेच, अमेरिकन लष्कराने ओमानच्या आखातात एका व्यावसायिक जहाजाच्या इंजिन रूमवर हेलफायर (Hellfire) क्षेपणास्त्र डागल्याच्या घटनेनंतर घडामोडी घडल्या आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) शुक्रवारी एक निवेदन जारी करून सांगितले की, त्यांच्या दलांनी गॅम्बियाचा ध्वज असलेल्या ‘लियान स्टार’ नावाच्या जहाजाला निकामी केले, कारण ते जहाज इराणच्या बंदराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते.
सेंटकॉम (CENTCOM) च्या मते, अमेरिकन विमानाने जहाजाच्या इंजिन रूमवर हेलफायर क्षेपणास्त्र डागण्यापूर्वी त्या जहाजाला २० हून अधिक इशारे देण्यात आले होते. या हल्ल्यानंतर जहाजाने इराणच्या दिशेने जाणे थांबवले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी जाहीर केले की, युनायटेड स्टेट्स (अमेरिका) गेल्या महिन्यात इराणी बंदरांवर लादलेली नौदलाची नाकेबंदी (Naval Blockade) उठवेल. ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेच्या नौदलाच्या नाकेबंदीमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अडकलेली जहाजे आता घरी परतू शकतात, ज्यामुळे जगातील अत्यंत धोरणात्मक जलमार्गांपैकी एका मार्गावरील तणाव कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. तथापि, अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी म्हटले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अमेरिकन नौदलाची कोंडी किंवा नाकेबंदी अजूनही पूर्णपणे लागू आहे.
